प्रसाद गो. जोशी -
डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहामध्ये कोणतेही महत्त्वाचे मुद्दे नसताना बाजाराने काही प्रमाणात वाढ दाखविली. आजपासून सुरू होत असलेल्या सप्ताहामध्ये जानेवारी महिन्याची परचेस मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)ची आकडेवारी आणि वाहनविक्रीची आकडेवारी याकडे बाजाराचे लक्ष राहणार आहे.
डिसेंबर तिमाहीची कंपन्यांची कामगिरी काही दिवसांमध्ये जाहीर हाेईल. तसेच अर्थसंकल्पाकडेही बाजाराचे लक्ष राहणार आहे. याशिवाय अमेरिकेत बेरोजगारीची आकडेवारीही या सप्ताहात जाहीर होणार असल्याने त्याचा परिणामही बाजाराच्या कामगिरीवर होत असतो.
गुंतवणूकदारांचे भांडवल वाढले
- गतसप्ताहामध्ये बाजार वाढल्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भांडवलामध्ये झालेल्या वाढीच्या स्वरूपामध्ये बघावयास मिळाला. बाजारामध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य १ लाख ३२ हजार ७७२.९० कोटी रुपयांनी एका सप्ताहामध्ये वाढले आहे.
- सप्ताहाअखेर कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलमूल्य ४,४२,३१,९९०.२२ कोटी रुपये झाले आहे. भांडवलमूल्य वाढल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसे सकारात्मक वातावरण दिसून येते.
१३ स्टार्टअप कंपन्यांचे आले आयपीओ
सन २०२४ मध्ये १३ स्टार्टअप कंपन्यांनी भारतीय बाजारात प्रारंभिक भागविक्री करून त्यामधून २९ हजार २४७ कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. गेल्या चार वर्षांमधील स्टार्टअप आयपीओंची ही सर्वाधिक संख्या आहे.
या वर्षामध्ये स्विगीचा आयपीओ हा सर्वात मोठा (११,३२७.४३ कोटी) राहिला. त्यापाठोपाठ ओला इलेक्ट्रिक (६१४५.५६ कोटी) आणि फर्स्टक्राय (४१९३.७३ कोटी)चे आयपीओ राहिले.
या कंपन्यांच्या लिस्टिंगचा विचार करता टीएसी सिक्युरिटीने सर्वाधिक १७३.५८ टक्केवारीसह नोंदणी केली. त्यानंतर युनिकॉमर्स ( ११७ टक्के) आणि मोबिक्विक (५७.७१ टक्के) वाढीसह नोंदविले गेले.
परकीय वित्तसंस्थाकडे लक्ष
परकीय वित्तसंस्थांकडे लक्ष राहणार आहे. ख्रिसमसचा सण संपत आल्याने या संस्थांकडून आता पैसे काढण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांनी भारतामध्ये पैसे गुंतविल्यास भारतीय बाजारामध्ये तेजीची शक्यता आहे.