प्रसाद गो. जोशी, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावामुळे गतसप्ताह शेअर बाजारात थोडा घसरणीचा राहिला असला तरी आता या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याने बाजाराचा आलेख वाढण्याची शक्यता दिसत आहे. या जोडीलाच या सप्ताहात जाहीर होणारी विविध प्रकारची आकडेवारी कशी राहणार यावर बाजाराची प्रतिक्रिया अवलंबून आहे.
दोन्ही शेजारी देशांमध्ये तणावामुळे बाजाराने फारशी तीव्र प्रतिक्रिया दिली नाही. या वृत्तामुळे पाकिस्तानचे शेअर बाजार कोसळले असले तरी तसा परिणाम भारतामध्ये दिसला नाही. भारतामधील बाजार थोडासा खाली आला. मात्र, तो अगदीच उशिरा.
आगामी सप्ताहामध्ये चलनवाढीची आकडेवारी तसेच अनेक कंपन्यांची तिमाही निकालाची आकडेवारी जाहीर होणार आहे. याकडेही बाजाराचे लक्ष असेल. परकीय वित्तसंस्थांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आशादायक असल्याने त्यांच्याकडून भारतामधील खरेदी कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे या सप्ताहात बाजार उसळी घेण्याची शक्यता आहे.
तिमाही निकालांकडे लक्ष
भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव बाजाराला त्रासदायक ठरला. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चांगल्या गोष्टी घडल्या तरी बाजारावर त्यांच्यापेक्षा तणाव वरचढ ठरल्याने गेले तीन आठवडे वाढत असलेला शेअर बाजार गतसप्ताहात खाली आला.
वित्तसंस्थांचा विश्वास वाढलेल्या तणावात कायम
अर्थव्यवस्था चांगला विकासदर गाठू शकते. त्यामुळे परकीय तसेच देशांतर्गत वित्तसंस्था आशादायक आहेत. त्यामुळे तणावामुळे बाजार खाली येत असतानाच या दोन्ही वित्तसंस्थांनी खरेदी केली आहे. गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी शेअर बाजारात ५०४७ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांनी १०,४५०.९६ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.