लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वाढत्या महागाईशी झुंजणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत २०२६ मध्ये मोठी घसरण होऊन, जून महिन्यापर्यंत तेलाचे दर प्रति बॅरल ५० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण अंदाज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात महागाई कमी, रुपया मजबूत आणि आर्थिक वाढीस चालना मिळेल, असे अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार, सौदी अरेबिया व रशिया सारख्या ‘ओपेक प्लस’ देशांनी तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने किमतीत सातत्याने घसरण होत आहे. सध्या भारतीय क्रूड बास्केटचे दर ६२.२० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. हे दर लवकरच ५० डॉलरच्या पातळीला स्पर्श करतील. तेलाच्या किमतीवर व्हेनेझुएलासारख्या देशांतील भू-राजकीय तणावाचाही आता फारसा परिणाम होताना दिसत नाही.
दरात कपातीची आशा
अहवालात नमूद केल्यानुसार, जर कच्च्या तेलात १४ टक्के घट झाली, तर त्याचा परिणाम किरकोळ विक्रीच्या दरांवर (पेट्रोल-डिझेल) होऊन महागाईचा दर ३.४ टक्के च्या खाली येऊ शकतो.
भविष्यात मोठी मंदी? : सध्या भारतीय कच्च्या तेलाची किंमत ६२.२० डॉलर प्रति बॅरल असून ती ५० आणि २०० दिवसांच्या ‘मूव्हिंग ॲव्हरेज’च्या खाली आहे. हे भविष्यातील मोठ्या मंदीचे संकेत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होऊ शकते. मालवाहतूक स्वस्त झाल्याने भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती घटतील.
अहवालात काय म्हटलेय?
मार्चपर्यंत मोठी घसरण : अमेरिकन एनर्जी इन्फॉर्मेशन विभागाच्या अंदाजानुसार, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ब्रेंट क्रूडची किंमत ५५ डॉलरवर येईल.
साठ्यात वाढ : कच्च्या तेलाचा जागतिक पुरवठा आणि साठवणूक वाढत असल्याने किमतीवर दबाव निर्माण होत आहे.
भारतीय बास्केटवर परिणाम : ब्रेंट क्रूड आणि भारतीय क्रूड बास्केटमध्ये ९८ टक्के साम्य आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर दर पडल्यास भारतातही तेल स्वस्त होईल.
रुपया होणार मजबूत : कच्च्या तेलाच्या आयातीवर भारताला मोठा परकीय चलन खर्च करावा लागतो. तेलाचे दर कमी झाल्यास भारताचे आयात बिल कमी होईल, ज्यामुळे रुपया अधिक मजबूत होईल. सध्या रुपया ९०.२८ प्रति डॉलरच्या आसपास असताना, तो ८७.५० पर्यंत सुधारण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
