Vodafone Idea News: व्होडाफोन आयडियाला सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय. या दिलास्यामुळे येत्या काही दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळू शकते. स्पेक्ट्रम लिलावाच्या थकीत रकमेच्या तुलनेत ३६,९५० कोटी रुपयांच्या शेअर्सचं नव्यानं अधिग्रहण करून व्होडाफोन आयडियामधील हिस्सा ४८.९९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास सरकारनं सहमती दर्शविली आहे. सध्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या व्होडाफोन आयडियामध्ये सरकार २२.६ टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठा भागधारक आहे.
व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं (VIL) सरकारनं घेतलेल्या अतिरिक्त हिस्स्याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली. आता ही बातमी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ आणि एअरटेलला हादरवू शकते. दोन्ही कंपन्यांनी आपले स्पेक्ट्रमची रक्कम वेळेवर भरली असून व्होडाफोन आयडियाला या आघाडीवर दिलासा देण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही कंपन्यांनी यापूर्वी आवाज उठवला होता. व्होडाफोन आयडियानं काय म्हटलंय हेदेखील जाणून घेऊ.
"आम्ही खचलेलो नाही, पुन्हा उभे राहू," Byju's च्या फाऊंडरनं शेअर केला जुना फोटो, पाहा काय म्हणाले?
३६,९५० कोटींचा दिलासा
दूरसंचार क्षेत्रासाठी सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सुधारणा आणि समर्थन पॅकेजच्या अनुषंगानं दळणवळण मंत्रालयाने मोरेटोरियम कालावधी संपल्यानंतर भराव्या लागणाऱ्या स्थगित थकबाकीसह थकित स्पेक्ट्रम लिलावाची रक्कम भारत सरकारला देण्यात येणाऱ्या इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं कंपनीनं म्हटलं.
इक्विटी शेअर्समध्ये रुपांतरित होणारी एकूण रक्कम ३६,९५० कोटी रुपये आहे. बाजार नियामक सेबी आणि इतर प्राधिकरणांनी आवश्यक आदेश जारी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्रत्येकी १० रुपये फेस व्हॅल्यूचे ३,६९५ कोटी इक्विटी शेअर्स प्रत्येकी १० रुपये इश्यू प्राइसवर जारी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय.
सुमारे ४९ टक्के वाटा
नवीन इक्विटी शेअर्स जारी केल्यानंतर भारत सरकारचा हिस्सा सध्याच्या २२.६० टक्क्यांवरून ४८.९९ टक्क्यांपर्यंत वाढेल, असं कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. व्होडाफोन आयडियानं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रवर्तकांचं कंपनीचं ऑपरेशनल नियंत्रण कायम राहील. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली टेलिकॉम कंपनी स्पेक्ट्रम लिलावाची रक्कम सरकारला देण्यात अपयशी ठरली होती. ज्यानंतर कंपनीने थकित देयकाच्या बदल्यात २२.६ टक्के हिस्सा सरकारला दिला.