नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी परवडणारी विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो सध्या एका अभूतपूर्व ऑपरेशनल संकटातून जात आहे. वैमानिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेचे व्यवस्थापन करणे कंपनीसाठी एक मोठे आव्हान ठरले आहे. याचा थेट परिणाम विमानसेवेवर झाला असून, ५ डिसेंबर २०२५ या एकाच दिवशी इंडिगोच्या १००० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
या गंभीर स्थितीवर इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कबूल केले की, गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या कामकाजात अडथळे येत आहेत आणि ५ डिसेंबर रोजी कामकाजावर सर्वात मोठा परिणाम झाला आहे.
एल्बर्स यांनी रद्द झालेल्या उड्डाणांमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, ज्या प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांनी कृपया विमानतळावर न येण्याचे आवाहन केले आहे. कंपनीचे कामकाज पूर्ववत करण्यासाठी संपूर्ण सिस्टीम 'रिबूट' केली जात आहे. सीईओ एल्बर्स यांनी प्रवाशांना दिलासा देत सांगितले की, इंडिगोच्या सेवेमध्ये १० ते १५ डिसेंबरच्या दरम्यान पूर्णपणे सामान्य स्थिती बहाल होईल. तोपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
इंडिगोने तिकीट बुकिंग घेतली...
अनेक उद्योगपतींनी इंडिगोवर गंभीर आरोप केला आहे. आपली विमानसेवा रद्द होणार असल्याचे माहिती असूनही इंडिगो प्रवाशांकडून तिकीट बुकिंग घेत होती, असा आरोप त्यांनी केला आहे. हा मोठा घोटाळा असून डीजीसीएने याची चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे.
इंडिगोची विमाने रद्द झाल्याने देशांतर्गत अन्य कंपन्यांच्या विमानफेऱ्यांची तिकिटाच्या दरांनी कहर केला आहे. मुंबई-बंगळुरू ८१ हजार, चेन्नई १ लाख असे तिकिटांचे दर झाले आहेत. यामुळे विमान प्रवाशांत मोठी खळबळ उडाली होती.
