Crypto Market Down: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठे भूकंपाचे संकेत आहेत. सिंगापूरमधून आलेल्या बातमीनुसार, मंगळवारी बिटकॉइनची (Bitcoin) किंमत सात महिन्यांत पहिल्यांदाच ९०,००० डॉलर्सच्या (सुमारे ७५ लाख रुपये) खाली आली आहे. हा एक नवीन संकेत आहे की गुंतवणूकदारांचा धोकादायक व्यवसायातून (Riskier Trading) मोहभंग होत आहे.
जोखीम मानल्या जाणाऱ्या या क्रिप्टोकरन्सीने २०२५ मध्ये झालेली सर्व वाढ गमावली आहे. ऑक्टोबरमध्ये १,२६,००० डॉलर्सच्या (सुमारे १.०५ कोटी रुपये) शिखरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत याच्या किमतीत जवळपास ३०% घट झाली आहे. आशियाई बाजारात दुपारपर्यंत बिटकॉइनची किंमत २% नं घसरून ८९,९५३ डॉलर (सुमारे ७४.९ लाख रुपये) वर पोहोचली. गेल्या आठवड्यातच ती ९८,००० डॉलर्सच्या (सुमारे ८१.६ लाख रुपये) आपल्या सपोर्ट लेव्हलच्या खाली घसरली होती.
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
घसरणीची कारणं
बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात करण्याबद्दल असलेली अनिश्चितता आणि व्यापक बाजारपेठेतील नकारात्मक मूडनं क्रिप्टो बाजाराला खाली खेचलंय. हाँगकाँग वेब३ असोसिएशनचे सह-अध्यक्ष जोशुआ चू यांच्या मते, "मोठ्या कंपन्या आणि संस्थांनी तेजीच्या काळात खरेदी केलेले शेअर्स विकल्यामुळे ही घसरण आणखी वेगवान होत आहे, ज्यामुळे संपूर्ण बाजारात भीती पसरण्याचा धोका वाढला आहे."
इतर क्रिप्टो आणि शेअर्सवर परिणाम
बिटकॉइनसोबतच इतर क्रिप्टोकरन्सी आणि त्यांच्याशी संबंधित शेअर्सवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. ईथर नावाच्या क्रिप्टोकरन्सीची किंमत ऑगस्ट महिन्यातील शिखरावरून ४०% घसरून २,९९७ डॉलर (सुमारे २.५ लाख रुपये) वर पोहोचली आहे. बिटकॉइन जमा करणाऱ्या कंपन्या, मायनिंग कंपन्या आणि एक्सचेंजेसच्या शेअर्समध्येही घट झाली आहे. आशियामध्येही बाजार घसरले आहेत, विशेषतः जपान आणि दक्षिण कोरियाच्या टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये ही घसरण दिसून आली आहे.
हे कशाचे संकेत?
या वर्षाच्या सुरुवातीला बिटकॉइनमध्ये घट झाल्यानंतरच एप्रिल महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे, काही लोकांना भीती आहे की, क्रिप्टोमधील ही घसरण पुन्हा एकदा मोठ्या बाजार संकटाचे संकेत तर देत नाहीये ना.
आता पुढे काय?
ॲस्ट्रोनॉट कॅपिटलचे मुख्य गुंतवणूक अधिकारी मॅथ्यू डिब यांच्या मते, "क्रिप्टो बाजारामध्ये गुंतवणूकदारांचं मनोधैर्य खूप कमजोर झालं आहे. जर बाजारात चढ-उतार कायम राहिला, तर बिटकॉइनची पुढील सपोर्ट लेव्हल ७५,००० डॉलर (सुमारे ६२.५ लाख रुपये) असू शकते."
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
