प्रसाद गो. जोशी
विविध कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल, अमेरिकेने जाहीर केलेली महागाईची आकडेवारी, भारत- अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराची स्थिती आणि परकीय वित्तसंस्थांची भूमिका यावर बाजाराची या सप्ताहाची भूमिका ठरणार आहे.
मंगळवारी बाजारात होणाऱ्या मुहूर्ताच्या सौद्यांनी आगामी काळातील बाजाराचा मूड कसा असेल याचे संकेत मिळणार आहेत. असे असले तरी बाजार वर्षातील विक्रमाच्या जवळपास आलेला असल्याने तो वाढण्याचीच शक्यता आहे. त्यानंतर बाजार कोणत्या दिशेने वळतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
व्याजदर कमी होण्याचे संकेत देऊ शकतात बाजाराला उभारी
शुक्रवारी जाहीर झालेली अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी बाजारावर प्रथम प्रभाव राहील. भारत - अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावर बाजाराची नगर राहणार आहे.
ही प्रक्रिया अतिशय योग्य प्रकाराने सुरू असल्याचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केल्यामुळे बाजाराला लवकरच चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे.
त्याचबरोबर अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याचे मिळालेले संकेत हे बाजाराला नवी उभारी देऊन जाऊ शकतात. कंपन्यांचे आलेले तिमाही निकालही बाजाराच्या वाढीला हातभार लवू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष आहे.
उद्या मुहूर्ताचे ट्रेडिंग
विक्रम संवत २०८२साठीचे मुहूर्ताचे सौदे मंगळवार दि. २१ रोजी होणार आहेत. यासाठी शेअर बाजारात विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मुहूर्ताचे सौदे हे सायंकाळी होत असत. यंदा प्रथमच हे विशेष सत्र दुपारी १.४५ ते २.४५ या वेळेत होणार आहे. त्यासाठीही गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे.
परकीय वित्तसंस्थांची खरेदी
गेले काही महिने सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांना ऑक्टोबरच्या पूर्वार्धामध्ये खरेदी केल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ६४८० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा महत्वाचा बदल शेअर बाजाराला बळ देऊन जात आहे.
बाजारामध्ये परकीय वित्तसंस्था काय भूमिका घेतात याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे. या संस्था खरेदीसाठी उतरल्यास बाजाराला चांगला उठाव मिळू शकतो. या सप्ताहामध्ये मंगळवार व बुधवारी बाजाराला सुटी असल्यामुळे कमी कालावधी मिळणार आहे. तरीही नववर्षाच्या मुहूर्त ट्रेडींगला बाजार वाढण्याची शक्यता आहे.