Zerodha Nithin Kamath On AI: चीनचं नवं डीपसीक एआय मॉडेल जगभरात चर्चेचा विषय बनलं आहे. डीपसीकच्या एन्ट्रीमुळे अमेरिकेतील बड्या कंपन्यांच्या एआय मॉडेलला चांगलीच स्पर्धा मिळत आहे. या एआय मॉडेलची खास बाब म्हणजे हे एआय मॉडेल चीननं केवळ ६ मिलियन डॉलर्समध्ये तयार केलंय. त्याचवेळी ओपन एआय या अमेरिकन एआय मॉडेलचं चॅटजीपीटी बनवण्यासाठी जवळपास १० पट अधिक खर्च झालाय, पण एआयच्या बाबतीत भारत काय करत आहे? आता या प्रकरणावर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय म्हणाले कामथ?
ब्रोकिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्म झिरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना भारताविषयी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. नितीन कामथ यांनी आपल्या पोस्टद्वारे प्रश्न उपस्थित केला की, चीन एआय तंत्रज्ञानात खूप वेगाने पुढे जात आहे परंतु भारत एआय तंत्रज्ञानात काहीही का करत नाही? आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीमध्ये भारत पुढे का नाही?, असं ते म्हणाले.
भारत का पिछाडीवर?
तंत्रज्ञान आणि एआय इनोव्हेशनमध्ये भारत चीनपेक्षा मागे राहिला असल्याचं कामथ म्हणाले. याचं कारण सांगताना त्यांनी फंडींगपेक्षा यातील टॅलेंट भारतात थांबवू शकत नसल्याचं ते म्हणाले. "चीनच्या बाबतीत केवळ संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किमान दोन दशके (२० वर्षे) लागली. जर आपण आपलं संशोधन आणि वैज्ञानिक क्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली, तर आशा आहे की आपल्याला ५ ते १० वर्षांत आपल्याला परिणाम दिसतील, असं कामथ यांनी नमूद केलं.
१९६० आणि १९७० च्या दशकात भारत आणि चीनचा दरडोई जीडीपी जवळपास सारखाच होता. चीननं १९८० च्या दशकात सुधारणा सुरू केल्या आणि १९९० पर्यंत त्यांनी आपल्या दरडोई जीडीपीला मागे टाकलं होतं. आपला जागतिक दृष्टीकोन आणि आर्थिक मॉडेल यातील फरकाबद्दल तुम्ही काहीही म्हणाल, तरी त्यांची वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती खूप पुढे आहे. डीपसीक हे त्याचं ताजं उदाहरण असल्याचं कामथ म्हणाले.