जेव्हा वॉरेन बफे यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात निवृत्तीची घोषणा केली होती, तेव्हा संपूर्ण जगात एकच प्रश्न चर्चिला जात होता - आता 'बर्कशायर हॅथवे'च्या या अवाढव्य साम्राज्याचं काय होईल? वॉरेन बफे यांचा उत्तराधिकारी कोण असेल? परंतु आता लोकांना या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. आज, म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून, बफे यांच्या साम्राज्याची धुरा अधिकृतपणे ग्रेग एबेल (Greg Abel) यांच्या हाती आली आहे. एबेल हे नाव नवीन नाही, तर ते गेल्या अनेक दशकांपासून बर्कशायरच्या यशाचे 'सायलेंट इंजिन' राहिलेत. बफे त्यांना आपली 'एनर्जी मशीन' म्हणतात आणि आता याच मशीनच्या खांद्यावर जगातील सर्वात प्रतिष्ठित कंपनीच्या भविष्याची जबाबदारी आहे.
एबेल यांची कार्यशैली आणि अनुभव
६२ वर्षीय ग्रेग एबेल हे व्यावसायिकदृष्ट्या एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अनेकदा लोक त्यांची तुलना वॉरेन बफे यांच्याशी करतात, परंतु एबेल यांची शैली पूर्णपणे वेगळी आहे. जिथे बफे त्यांच्या जादूई 'स्टॉक-पिकिंग' क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत, तिथे एबेल हे उत्तम 'बिझनेस ऑपरेटर' मानले जातात. त्यांनी केवळ बर्कशायरचे एनर्जी आणि रेल्वे (BNSF) यांसारखे पायाभूत सुविधांचे मोठे व्यवसाय केवळ सांभाळले नाहीत, तर त्यांना नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांच्याकडे ऊर्जा क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ कामाचा सखोल अनुभव आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण
एबेल यांचा जन्म कॅनडातील अल्बर्टा येथील एडमंटन येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अग्निशमन उपकरणं बनवणाऱ्या कंपनीत सेल्स विभागात कार्यरत होते, तर आई कायदेशीर सहाय्यक म्हणून काम करत होती. ते एका पारंपारिक कुटुंबात वाढले, जिथे कौटुंबिक एकता आणि मेहनतीवर भर दिला जात असे. एबेल यांना चार मुलं आहेत. ते आपले खाजगी आयुष्य गोपनीय ठेवतात आणि आयोवा येथील डेस मोइन्समध्ये राहतात. ते प्रसिद्ध हॉकी खेळाडू सिड एबेल यांचे पुतणे आहेत.
शिक्षणाबद्दल बोलायचं झाले तर, १९८४ मध्ये त्यांनी अल्बर्टा विद्यापीठातून अकाउंटिंगमध्ये बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी विशेष श्रेणीत पूर्ण केली. ते 'अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाइड पब्लिक अकाउंटंट्स'चे (AICPA) प्रमाणित पब्लिक अकाउंटंट आहेत.
व्यावसायिक कारकीर्द
एबेल यांनी आपल्या करिअरची सुरुवात सॅन फ्रान्सिस्कोमधील 'प्राईस वॉटर हाऊस कूपर्स' (PwC) मधून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून केली. १९९२ मध्ये ते 'कॅलएनर्जी'मध्ये रुजू झाले. १९९९ मध्ये कॅलएनर्जीनं 'मिडअमेरिकन एनर्जी'चं अधिग्रहण केलं आणि त्याच वर्षी बर्कशायर हॅथवेनं यात नियंत्रण मिळवणारा मोठा वाटा खरेदी केला. २००८ मध्ये ते मिडअमेरिकनचे सीईओ झालं, ज्याचं २०१४ मध्ये 'बर्कशायर हॅथवे एनर्जी' असं नामकरण करण्यात आलं. जानेवारी २०१८ मध्ये त्यांना बर्कशायर हॅथवेच्या नॉन-इन्शुरन्स ऑपरेशन्सचे व्हाईस-चेअरमन बनवण्यात आलं आणि संचालक मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. ते क्राफ्ट हाइंज, ड्युक युनिव्हर्सिटी यांसारख्या संस्थांच्या बोर्डावर देखील आहेत.
उत्तराधिकारी म्हणून निवड
मे २०२१ मध्ये बफे यांनी एबेल यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले होते. मे २०२५ मध्ये अशी घोषणा झाली की, २०२५ च्या अखेरीस बफे निवृत्त झाल्यावर एबेल सीईओ बनतील. बफे यांनी त्यांची मेहनत, धोरणात्मक विचार आणि कंपनीची संस्कृती टिकवून ठेवण्याच्या क्षमतेमुळे त्यांची निवड केली. विशेष म्हणजे, बफे यांच्या निवृत्तीच्या घोषणेबद्दल एबेल यांना आधी कोणतीही माहिती नव्हती; ही गोष्ट केवळ बफे यांच्या मुलांना माहित होती. एबेल हे बफे यांना आपले मार्गदर्शक मानतात.
