न्यूयॉर्क : इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती आणि वस्तूंच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम म्हणून महागाई वाढून व्याजदर अपेक्षेपेक्षा जास्त राहू शकतात, असा इशारा ‘जेपी मॉर्गन चेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमन यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले की, इराण युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, यामुळे दीर्घकालीन महागाईचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव वाढवल्यानंतर जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली आहे.
गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
डिमन यांनी सांगितले की, वाढत्या ऊर्जा किमती आणि भू-राजकीय तणावामुळे शेअर बाजारावरही परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात ‘एसअँडपी ५००’ निर्देशांकाने २०२२ नंतरची सर्वात खराब कामगिरी नोंदवली. व्याजदरात कपात होण्याची बाजारपेठेची आशा आता धूसर होताना दिसत आहे.
हे आहेत महत्त्वाचे धोके
- तेलाचे दर : युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांत आणखी वाढ होऊ शकते, असे डिमन यांनी म्हटले आहे. सध्या तेलाचे दर ११० डॉलर प्रति बॅरलवर असून, यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे.
- अण्वस्त्र प्रसार : इराणशी संबंधित अण्वस्त्र प्रसाराचा सध्या सर्वात मोठा धोका असल्याचे डिमन यांनी इशारा देताना नमूद केले आहे.
- बँकिंग नियम : डिमन यांनी अमेरिकेच्या नवीन भांडवली नियमांवर (बॅसेल ३) टीका केली असून, त्यांना ‘अतार्किक’ आणि ‘बिगर-अमेरिकी’ म्हटले आहे.
