म्युच्युअल फंडमधील एसआयपी सुरू करताना विशिष्ट उद्देश समोर ठेवून ती सुरू करावी, हा गुंतवणुकीचा सर्वसमावेशक नियम असावा. एसआयपी म्हणजे विशिष्ट कालावधी किंवा तारीख ठरवून विशिष्ट रक्कम गुंतविणे. यामध्ये आर्थिक नियोजन नेमके असावे, जेणेकरून एसआयपीमध्ये खंड पडू नये. मात्र कधी कधी आर्थिक अडचण येऊ शकते आणि एखादा महिना किंवा पुढील काही महिन्यांमध्ये रक्कम गुंतविणे शक्य होत नाही. अशा वेळेस गुंतवणूकदार तात्पुरती त्या महिन्यासाठी किंवा पुढील सुरू करण्याच्या सूचनेपर्यंत एसआयपी थांबवू शकतो, म्हणजेच पॉझ करू शकतो. यामुळे बँक मँडेट फेल न होता पुढील विशिष्ट तारखेपासून पुन्हा एसआयपी सुरू होते/करता येते.
कशी पॉझ करता येते एसआयपी?
एसआयपी जर थेट स्वतः डिमॅट खात्यातून सुरु केली असेल तर म्युच्युअल फंडमधील एसआयपी सेक्शनमध्ये जाऊन ज्या फंडाची एसआयपी पॉझ करायची आहे, त्यावर क्लिक करून पॉझ नेक्स्ट एसआयपी वर क्लिक करून थांबविता येते. जर एसआयपी फक्त एका महिन्यासाठी थांबवायची असेल, तर हा पर्याय निवडावा. हे करताना एसआयपी तारखेच्या काही दिवस आधी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. जर आर्थिक अडचण पुढील काही महिन्यांसाठी असेल, तर त्यासाठीही स्वतंत्र पर्याय उपलब्ध असतो. योग्य पर्याय निवडून एसआयपी थांबविता येते.
जेव्हा पुन्हा सुरु करायची असल्यास तेव्हा पुन्हा रिस्टार्टवर जाऊन सुरु करता येते. जर एसआयपी म्युच्युअल फंड वितरकाच्या माध्यमातून सुरू केली असेल, तर त्यांच्याशी संपर्क साधूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते. तसेच, जर ती थेट म्युच्युअल फंड संस्थेमार्फत सुरू केली असेल, तर त्यांच्या ग्राहकसेवा क्रमांकावरूनही पॉझ करता येते. म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना सर्व स्तरावर सोयीची असावी यासाठी सेबीने नियमावली ठरवून दिल्या आहेत.