वाढते हप्ते आणि व्याजामुळे खर्च वाढतो. त्यामुळे महागड्या कर्जांची झटपट तपासणी करणे गरजेचे ठरते. आपल्या कर्जाचे डेब्ट ऑडिट कसे करावे याच्या काही युक्त्या पुढीलप्रमाणे आहेत.
१. कर्जांची यादी तयार करा
सर्व कर्जांची पूर्ण यादी करा. कर्जांची उर्वरित म्हणजेच परतफेड करणे शिल्लक असलेली रक्कम, व्याजदर, ईएमआय आणि कालावधी नोंदवा.
२. उच्च व्याजाचे कर्ज फेडा
सर्वाधिक व्याज असलेले कर्ज आधी फेडा. त्याला डेब्ट अव्हॅलांच पद्धत म्हणतात. बोनस, अतिरिक्त उत्पन्न थेट कर्जफेडीसाठी वापरावे.
३. कर्ज एकत्रिकरण
अनेक कर्जे असल्यास ती कमी व्याजाच्या एका कर्जात एकत्र करणे सोयीचे ठरते. त्यामुळे एकच ईएमआय आणि एकच कर्जदाता राहतो.
४. व्याजदर कपातीसाठी वाटाघाटी
उच्च क्रेडिट स्कोअर असल्यास कमी व्याजदर मिळण्याची शक्यता वाढते. बँकेशी चर्चा करून शुल्कमाफी किंवा व्याजदर कपात मागता येते.
५. प्री पेमेंट शुल्क तपासा
प्री पेमेंट करताना दंड किंवा शुल्क आहे का, हे तपासा. फ्लोटिंग दराच्या कर्जावर सहसा दंड नसतो; मात्र फिक्स्ड दराच्या कर्जावर २ ते ४ टक्के शुल्क लागू शकते. बचत आणि खर्च यांचा हिशेब करूनच निर्णय घ्या.
