Volkswagen Layoff: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटत असतानाच, अनेक देशांना अमेरिकन टॅरिफचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी फॉक्सवॅगननं (Volkswagen) मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा नफा गेल्या दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचल्यामुळे २०३० पर्यंत जर्मनीमध्ये ५०,००० नोकऱ्या कमी केल्या जातील. चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांकडून मिळणारी स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि अमेरिकन टॅरिफचा परिणाम यामुळे १० ब्रँडचा समावेश असलेला हा ग्रुप सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे.
सीईओ ओलिवर ब्लूम यांचं स्पष्टीकरण
फॉक्सवॅगन समूहाचे सीईओ ओलिवर ब्लूम यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, "जर्मनीमध्ये फॉक्सवॅगन ग्रुप २०३० पर्यंत एकूण सुमारे ५०,००० नोकऱ्या कमी करेल." हा निर्णय कंपनीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घेण्यात आला आहे.
Mahindra Thar ची वाढती क्रेझ: गाडी खरेदी करण्यासाठी किती पगार आणि EMI लागेल?
ऑडी आणि पोर्शच्या कर्मचाऱ्यांवरही होणार परिणाम
न्यूज एजन्सी एएफपीच्या (AFP) रिपोर्टनुसार, ग्रुपनं २०२४ च्या शेवटी कामगार संघटनांशी करार केला होता, ज्यामध्ये ३५,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचं ठरलं होतं. वार्षिक १५ अब्ज युरो वाचवण्याच्या योजनेचा हा एक भाग आहे. मात्र, सीईओ ब्लूम यांनी स्पष्ट केलं की, ही कपात केवळ मुख्य फॉक्सवॅगन ब्रँडपुरती मर्यादित नसेल, तर याचा परिणाम ऑडी (Audi), पोर्श (Porsche) या प्रीमियम ब्रँडसह कंपनीची सॉफ्टवेअर उपकंपनी 'कॅरियड'च्या कर्मचाऱ्यांवरही होईल.
जागतिक आव्हानं आणि चिनी कंपन्यांची स्पर्धा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून २०२५ मध्ये बिगर-अमेरिकन कार कंपन्यांवर टॅरिफ लादलं जाण्यापूर्वीपासूनच फॉक्सवॅगन अनेक आव्हानांशी झुंजत आहे. युरोपमधील मागणीत झालेली घट, ईव्ही (EV) क्षेत्रात गुंतवणुकीचा मोठा खर्च आणि चीनमधील विक्रीत झालेली घसरण यामुळे कंपनी दबावाखाली आहे. चीनमध्ये दीर्घकाळ दबदबा राखणाऱ्या फॉक्सवॅगनला आता तेथील स्थानिक कंपन्यांकडून, विशेषतः BYD आणि 'गीली' (Geely) कडून कडक स्पर्धा मिळत आहे. ब्लूम यांच्या मते, चिनी कंपन्यांच्या 'प्राइस वॉर'मुळे युरोपियन मार्केटमध्येही किंमतींचा दबाव वाढणार असून कंपनीला आपला उत्पादन खर्च कमी करणं अनिवार्य झालंय.
महसूल आणि नफ्यात मोठी घट
फॉक्सवॅगननं २०२५ साठी ८.९ अब्ज युरोंचं ऑपरेटिंग प्रॉफिट नोंदवलं आहे. हा आकडा विश्लेषकांच्या ९.४ अब्ज युरोच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. कंपनीचा पूर्ण वर्षाचा महसूल ३२२ अब्ज युरो राहिला आहे, जो २०२४ मध्ये ३२४.७ अब्ज युरो होता. २०२६ मधील सेल्स ग्रोथचा अंदाजही कमी वर्तवण्यात आला आहे.
कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अर्नो एंटलिट्झ यांनी २०२५ हे वर्ष अतिशय कठीण असल्याचं म्हटलंय, तरीही युरोपमध्ये कंपनीची स्थिती चांगली असल्याचा विश्वास त्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. मंगळवारी सकाळी फॉक्सवॅगनचे शेअर्स ४ टक्क्यांनी वधारले असले तरी, या वर्षात आतापर्यंत स्टॉक मध्ये १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. भविष्यात अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाच्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
