Aadhar Virtual ID : आधारकार्ड शिवाय देशात पानही हलत नाही, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, नवजात जन्मलेल्या बाळापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आधारकार्ड बंधनकारक आहे. आधारकार्ड हा ओळखीचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्ड भारत सरकारद्वारे जारी केले जाते. आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI १६ अंकी तात्पुरता कोड देखील जारी करते, जो पडताळणीच्या वेळी वापरला जातो. व्हर्च्युअल आयडी म्हणून हा १६ अंकी नंबर आधार क्रमांकाशी जोडला जातो. म्हणजे, साधारणपणे, व्हर्च्युअल आयडीचे १६ क्रमांक हे तुमच्या आधारच्या १२ क्रमांकांना पर्याय आहेत.
व्हर्च्युअल आयडी अनेक वेळा जनरेट करता येतो
व्हर्च्युअल आयडी क्रमांक निश्चित नसतो. हा तात्पुरत्या स्वरुपाचा क्रमांक असल्याने तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा ऑनलाइन जनरेट करू शकता. तुमच्या आधार कार्डच्या सुरक्षेसोबतच त्यासोबत फसवणूक होण्याचा धोकाही कमी होतो. व्हर्च्युअल आयडी सामान्यत: ई-केवायसी पडताळणीसाठी वापरला जातो. यासाठी अनेकवेळा आपण ऑनलाइन पोर्टलवर आधार क्रमांक भरतो, त्यानंतर एजन्सीला तुमच्या आधारशी संबंधित सर्व माहिती मिळवणे सोपे जाते. परंतु, जेव्हा तुम्ही व्हर्च्युअल आयडी भरता तेव्हा तुमचा आयडी पुरावा देण्याचा उद्देशही पूर्ण होतो. याद्वारे कोणीही तुमची आधारशी संबंधित माहिती मिळवू शकत नाही.
व्हर्च्युअल आयडीसह आधार सुरक्षित राहतो
अनेक वेळा आधारशी संबंधित माहिती लीक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे लोकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी UIDAI ने व्हर्च्युअल आयडीची संकल्पना आणली आहे. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आधार क्रमांकावरून व्हीआयडी जनरेट करता येतो. मात्र. एखाद्याच्या व्हीआयडीवरून आधार क्रमांक शोधू शकत नाही. व्हीआयडीची आणखी एक खासियत म्हणजे त्याची एक्सपायरी डेट नाही. याचा अर्थ तुम्ही नवीन VID जनरेट करेपर्यंत तो वैध राहतो.
व्हर्च्युअल आयडी तयार करणे खूप सोपे
व्हर्च्युअल आयडी तयार करणे देखील खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत साइटवर जा किंवा mAadhaar ॲप वापरा. UIDAI साइटवर उघडल्यानंतर Aadhar Services पर्याय निवडा आणि व्हर्च्युअल आयडी (VID) जनरेटरवर क्लिक करा. याशिवाय, तुम्ही myaadhaar.uidai.gov.in/genericGenerateOrRetriveVID या थेट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा १२ अंकी व्हर्च्युअल आयडी जनरेट करू शकता.