Petrol-Diesel Price: एसबीआय (SBI) रिसर्चच्या विश्लेषणानुसार, २०२६ मध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. जून महिन्यापर्यंत या किमती ५० डॉलर प्रति बॅरल या पातळीपर्यंत खाली येऊ शकतात. जर हा अहवाल खरा ठरला, तर या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. सध्याच्या बाजाराचा विचार केला तर ब्रेंट क्रूड १.०१ डॉलरनं वधारून ६१.७६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे, तर WTI क्रूड किरकोळ घसरणीसह ५८.२९ डॉलर प्रति बॅरलवर आहे.
अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, अहवालात असं नमूद करण्यात आलं आहे की ही घसरण वेगानं होऊ शकते, ज्याचा सकारात्मक परिणाम महागाई आणि आर्थिक विकासावर होईल. अमेरिकन ऊर्जा माहिती प्रशासनाच्या (EIA) अंदाजानुसार, साठवणुकीत वाढ झाल्यामुळे २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ब्रेंट क्रूडची सरासरी किंमत ५५ डॉलर प्रति बॅरल असू शकते. एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष आणि त्यांच्या टीमनं स्पष्ट केले की, भारतीय बास्केट आणि ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये ०.९८ चा सहसंबंध आहे, त्यामुळे जागतिक घसरणीचा फायदा भारताला नक्कीच मिळेल. तांत्रिक विश्लेषणानुसार, सध्याच्या किमती ५० आणि २०० दिवसांच्या 'मुव्हिंग एव्हरेज'च्या खाली आहेत, जे भविष्यातील अधिक घसरणीचे संकेत देतात.
भारतातील इंधनाचे सध्याचे दर
दिल्लीत इंडियन ऑईलच्या पंपावर पेट्रोलचा दर ९४.७७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे. मार्च २०२४ मध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत २ रुपयांची कपात करण्यात आली होती, त्यानंतर अद्याप कोणताही बदल झालेला नाही.
भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणारी शहरं:
- पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार): ₹८२.४६
- इटानगर (अरुणाचल प्रदेश): ₹९०.८७
- सिल्व्हासा: ₹९२.३७
- दमण: ₹९२.५५
- हरिद्वार (उत्तराखंड): ₹९२.७८
भारतात सर्वात स्वस्त डिझेल मिळणारी शहरं:
- पोर्ट ब्लेअर: ₹७८.०५
- इटानगर: ₹८०.३८
- जम्मू: ₹८१.३२
- सांबा: ₹८१.५८
- चंदीगड: ₹८२.४४
(स्त्रोत - इंडियन ऑईल)
