Swiggy 2025 Record Orders: ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी कंपनी स्विगीनं मंगळवारी एक विशेष अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कंपनीनं २०२५ या वर्षात सर्वाधिक ऑर्डर मिळालेल्या पदार्थांची माहिती दिली आहे. स्विगीच्या 'हाऊ इंडिया स्विगीड' अहवालानुसार, यावर्षी भारतीयांनी ज्या पदार्थांना सर्वाधिक पसंती दिली, त्यामध्ये बिर्याणी, बर्गर, पिझ्झा आणि डोसा यांचा समावेश आहे. या यादीत बिर्याणीनं प्रथम स्थान पटकावले असून भारतीयांनी यावर्षी स्विगीवर सर्वात जास्त बिर्याणीची ऑर्डर दिली आहे.
२०२५ मध्ये बिर्याणीच्या ९.३ कोटी ऑर्डर
स्विगीच्या 'हाऊ इंडिया स्विगीड' अहवालाच्या १० व्या व्हर्जनमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, यावर्षी युजर्सचा आवडता पदार्थ बिर्याणी ठरला आहे. कंपनीला या वर्षात बिर्याणीच्या एकूण ९.३ कोटी ऑर्डर मिळाल्या. आवडीच्या पदार्थांच्या यादीत बर्गर दुसऱ्या स्थानावर असून त्याच्या एकूण ४.४२ कोटी ऑर्डर मिळाल्यात. तिसऱ्या स्थानावर पिझ्झा असून स्विगीनं यावर्षी ४.०१ कोटी पिझ्झाच्या ऑर्डर पूर्ण केल्या. तसंच सर्वाधिक ऑर्डर केल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये डोसा चौथ्या स्थानावर राहिला असून यावर्षी २.६२ कोटी डोसा ऑर्डर्सची डिलिव्हरी करण्यात आली.
सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
प्रादेशिक खाद्यपदार्थांची मागणी आणि जागतिक कल
स्विगीनं आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, भारतीयांमध्ये स्थानिक खाद्यपदार्थांची आवड कायम आहे. यावर्षी पहाडी जेवणाच्या ऑर्डर्समध्ये नऊ पटीने वाढ झाली आहे, तर मलबार, राजस्थानी, मालवणी आणि इतर प्रादेशिक खाद्यपदार्थांच्या मागणीत गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. अहवालानुसार, दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीच्या जेवणाच्या ऑर्डर्स सुमारे ३२ टक्क्यांनी अधिक होत्या. प्रादेशिक पदार्थांसोबतच जागतिक खाद्यपदार्थांनाही मोठी मागणी मिळाली. भारतीयांनी १.६ कोटी मेक्सिकन डिशेस, १.२ कोटींहून अधिक तिबेटी डिशेस आणि ४७ लाख कोरियन खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स स्विगीवरून केल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय.
