Us Visa Policy : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून त्यांनी आपलं खरं रुप दाखवायला सुरुवात केली आहे. जशास तसे शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेने आता व्हिसाच्या बाबतीतही आपली भूमिका बदलली आहे. यापूर्वी बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसलेल्या भारतीयांना ट्रम्प सरकारने भारतात आणून सोडले आहे. आता ट्रम्प इमिग्रेशनच्या संदर्भात अॅक्शन मोडमध्ये आल्यानंतर अमेरिकेत असलेल्या हजारो भारतीयांवर बाहेर काढले जाण्याची टांगती तलवार आहे. एका अंदाजानुसार, अमेरिकेतील भारतीय H1-B व्हिसाधारकांची एक लाखाहून अधिक मुले अमेरिकेतून भारतात पाठवण्याचा धोका आहे.
काय आहे इमिग्रेशन पॉलिसी?
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, आतापर्यंत अमेरिकन इमिग्रेशन पॉलिसी अंतर्गत अशा मुलांना वय (२१ वर्षे) पूर्ण झाल्यानंतर नवीन व्हिसाचा दर्जा निवडण्यासाठी २ वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत नियमांमध्ये बदल आणि अलीकडील काही न्यायालयीन प्रकरणांमुळे सध्याची तरतूद रद्द होण्याची भीती वाढली आहे, त्यामुळे तेथे वास्तव्यास असलेले भारतीयांची चिंता वाढली आहे.
सुमारे १.२४ लाख भारतीय मुलांना बाहेर काढण्याची भिती
अहवालानुसार, मार्च २०२३ चा डेटा पाहता, सुमारे १.३४ लाख भारतीय मुलांचा अवलंबित व्हिसाचा दर्जा त्यांच्या कुटुंबियांना ग्रीन कार्ड मिळण्यापूर्वीच संपण्याची शक्यता आहे. टेक्सासमधील अलीकडील न्यायालयाच्या निर्णयाने नवीन अर्जदारांना डिफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहुड अरायव्हल्स (DACA) अंतर्गत वर्क परमिट देण्यापासून रोखले आहे, ज्यामुळे गोंधळ वाढला आहे. या तरतुदीशिवाय भारतीय तरुण अनिश्चिततेच्या गर्तेत अडकण्याची भीती आहे. पालकांनी ग्रीन कार्डसाठी १२ वर्षे ते १०० वर्षांच्या प्रतीक्षा कालावधीसह अर्ज केला आहे, ही समस्या आणखी गुंतागुंतीची आहे.
भारतीयांसाठी अमेरिकेत कोणते व्हिसा?
- B-1/B-2 व्हिजिटर व्हिसा : पर्यटन किंवा व्यावसायिक हेतूंसाठी.
- C-1 ट्रान्झिट व्हिसा : युनायटेड स्टेट्समधून इतर देशांत जाण्यासाठी.
- D क्रू मेंबर व्हिसा: जहाज किंवा विमानात सेवा देणाऱ्या क्रू सदस्यांसाठी.
- H-1B वर्क व्हिसा : सैद्धांतिक किंवा तांत्रिक कौशल्य आवश्यक असलेल्या विशेष व्यवसायांसाठी.
- L1 इंट्राकंपनी ट्रान्सफर व्हिसा : व्यवस्थापकीय, कार्यकारी किंवा विशेष ज्ञान भूमिकांमध्ये काम करणाऱ्या इंट्राकंपनी हस्तांतरणासाठी.
- J1 एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा: सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणाऱ्या एक्सचेंज प्रोग्राममधील सहभागींसाठी.