America Tourist Visa : अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच धक्का दिला आहे. तिथं काम करण्यासाठी लागणारा एच-१बी व्हिसाचे नियम कठोर केले आहेत. आता अमेरिकेत जाऊन बाळाला जन्म देऊन त्याला तेथील नागरिकत्व मिळवून देण्याचे स्वप्नही धुळीस मिळणार आहे. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, ज्या भारतीय नागरिकांचा हेतू केवळ अमेरिकेत बाळाला जन्म देणे हा असेल, त्यांना टूरिस्ट व्हिसा दिला जाणार नाही.
'जन्मसिद्ध नागरिकत्व' धोरणाचा गैरवापर
अमेरिकेच्या संविधानातील १४ व्या दुरुस्तीनुसार, अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. यालाच 'जन्मसिद्ध नागरिकत्व' म्हणतात. सध्या अमेरिका जन्मसिद्ध नागरिकत्वाचा गैरफायदा घेऊन येणाऱ्या लाखो लोकांचा भार सहन करण्याच्या स्थितीत नाही. हे संवैधानिक बदल मूलतः गृहयुद्धाच्या वेळी आफ्रिकन-अमेरिकन गुलामांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आले होते. परंतु, आता त्याचा गैरवापर होत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
काय होईल परिणाम?
'बर्थ टुरिझम'च्या हेतूने व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अर्ज आता थेट फेटाळला जाईल. हे पाऊल अमेरिकेने 'बर्थ टुरिझम'च्या वाढत्या उद्योगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उचलले आहे.
नोकरी करणाऱ्यांचं काय होणार?
H-1B व्हिसाधारक अमेरिकेत काम करण्यासाठी आणि वास्तव्यासाठी कायदेशीररित्या उपस्थित असतात. त्यांच्या मुलांना अमेरिकेत जन्मल्यावर नागरिकत्व मिळते. सध्याच्या नियमानुसार, या नागरिकांवर या नवीन नियमाचा थेट परिणाम होणार नाही, कारण ते पर्यटनासाठी नव्हे, तर कामासाठी अमेरिकेत आहेत. मात्र, 'बर्थ टुरिझम' रोखण्यासाठी कडक धोरणे लागू केल्यामुळे, भविष्यात H1B व्हिसाधारकांसाठी देखील नागरिकत्वाच्या नियमांमध्ये आणखी बदल होऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
आधीच जन्मलेल्या मुलांच्या नागरिकत्वाचे काय?
ट्रम्प प्रशासनाने या प्रश्नाचे उत्तर अजून दिलेले नाही. ट्रम्प यांनी याबाबत कोणताही विचार केलेला नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात आधीच जन्मलेल्या मुलांच्या नागरिकत्वावर परिणाम होईल की नाही, याबाबत अनिश्चितता कायम आहे. अमेरिकेने घेतलेला हा कठोर निर्णय भारतीय पर्यटकांसाठी एक मोठा इशारा आहे, ज्यामुळे केवळ व्हिसाच नाही, तर अमेरिकेत स्थलांतर करून नागरिकत्व मिळवण्याच्या प्रक्रियेचे भविष्यही अनिश्चित झाले आहे.
