बिजिंग : भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव शिगेला पोहचला असताना अमेरिका-चीनमधील टॅरिफ वॉर चांगलेच भडकले आहे. अमेरिकेतून येणाऱ्या ऑर्डर्स रद्द झाल्याने चीनमधील अनेक कारखान्यांना टाळे लागले आहे. त्यामुळे गोल्डमन सॅक्सच्या अंदाजानुसार अमेरिकेला निर्यात करणाऱ्या क्षेत्राशी जोडलेल्या चीनमधील १ ते २ कोटी कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
शांघायमधील कन्सल्टिंग फर्म ‘टाइडलवेव्ह सोल्यूशन्स’च्या कॅमेरन जॉन्सन यांच्या मते, खेळणी, खेळाचे साहित्य आणि स्वस्त उत्पादने तयार करणाऱ्या अनेक कारखान्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. उत्पादन जवळजवळ थांबवले आहे. ग्वांगझोउस्थित ‘इमॅक्स सोर्सिंग सर्व्हिसेस’ या कंपनीचे प्रमुख एश मोंगा यांच्या मते, टॅरिफचा प्रभाव कोविड-१९ पेक्षा अधिक गंभीर आहे.
टेक कंपन्याही देशातील इतर कंपन्यांच्या मदतीला धावल्या आहेत. ‘बायडू’ने शेकडो कंपन्यांना मोफत एआय टूल्स आणि व्हर्चुअल होस्टची सुविधा दिली आहे जेणेकरून त्या लवकरात लवकर ऑनलाइन विक्री सुरू करू शकतील.
अनेक चीनी कंपन्या आता अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोप आणि लॅटिन अमेरिकेत नवे ग्राहक शोधत आहेत. भारत आणि दक्षिण-पूर्व आशियात उत्पादन युनिट्स उभारण्याचा विचारही सुरू आहे. येत्या महिन्यांत हा बदल चीनच्या निर्यात मॉडेलला पूर्णपणे बदलू शकतो. (वृत्तसंस्था)
अनेक उद्योगांना फटका
चीनचे मुख्य निर्यात केंद्र असलेल्या यीवू आणि डोंगगुआनमध्ये स्थिती सर्वात चिंताजनक आहे.
निंगबोमधील वुड्सवूल या ॲथलेटिक वेअर कारखान्याने देशांतर्गत बाजारात ऑनलाइन विक्री सुरू केली आहे.
‘जेडी डॉट कॉम’ने सुमारे २७ अब्ज डॉलर्सची देशांतर्गत खरेदी योजना सुरू केली. कंपनीने स्थानिक विक्रीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
भारतासाठी संकटात संधी
मालाला मागणी वाढणार : अमेरिकन कंपन्या पूर्वी चीनकडून माल मागवत. त्या आता भारतासारख्या देशांकडे पाहू लागल्या आहेत. त्यामुळे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, चपला, फर्निचर आदींची भारताची निर्यात वाढू शकते.
चिनी स्वस्त माल कमी येणार :
चीनकडून भारतात येणारा स्वस्त माल जसे खेळणी, गॅझेट्स, डेकोरेशन आयटम्स कमी होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना फायदा होईल.
गुंतवणूक, रोजगार वाढणार : परदेशी कंपन्या चीनमधून बाहेर पडून भारतात कारखाने उभारू शकतात. भारत सरकार त्यांना ‘मेक इन इंडिया’ व ‘पीएलआय’ या योजनांचे लाभ देण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पादन वाढू शकते.