US Federal Reserve : अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या अशा नाजूक वळणावर उभी आहे, जिथे सेंट्रल बँकेच्या एका चुकीच्या निर्णयाने जागतिक बाजारात मोठे भूंकप येऊ शकतात. अशा परिस्थितीत, यूएस फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करून जगाचे लक्ष वेधले आहे. मात्र, दिलासादायक कपातीसोबतच फेडने भविष्यात मोठी कपात होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यामुळे गुंतवणूकदार एकाच वेळी दिलासा आणि सावधगिरी या दुहेरी स्थितीत अडकले आहेत.
फेडरल रिझर्व्हने काय निर्णय घेतला?
- फेडने ओवरनाईट कर्ज दरात ०.२५ टक्के अंकांची कपात केली आहे. यामुळे नवे दर ३.५% ते ३.७५% या कक्षेत पोहोचले आहेत. बाजाराच्या अपेक्षेनुसारच हा निर्णय होता.
- कपात करूनही फेडचा पवित्रा 'हॉकिश' म्हणजे कठोर राहिला. भविष्यातील दर कपातीबद्दल कोणताही मोठा सकारात्मक संकेत देण्यात आला नाही.
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा प्रस्ताव ९ विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला. ६ वर्षांनंतर प्रथमच समितीमध्ये इतके मोठे मतभेद दिसून आले. एका सदस्याला ०.५०% जास्त कपात हवी होती, तर दोन सदस्यांनी कोणत्याही कपातीला विरोध केला.
महागाई आणि जीडीपीचा अंदाज
फेडरल ओपन मार्केट समितीने अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा अंदाज वाढवून २.३% पर्यंत नेला आहे. महागाई सध्या २% च्या लक्ष्यापेक्षा खूप वर आहे. फेडच्या अंदाजानुसार, महागाई २०२८ पर्यंतही लक्ष्याच्या जवळ पोहोचणार नाही. सप्टेंबरमध्ये महागाई दर २.८% राहिला, जो अजूनही चिंतेचा विषय आहे.
ट्रेझरी बॉन्डची खरेदी पुन्हा सुरू
व्याजदर कपातीसोबतच फेडने आपल्या बॅलन्स शीटवरही मोठा निर्णय घेतला आहे. फंडिंग मार्केटमधील दबाव कमी करण्यासाठी फेडने शुक्रवारपासून ४० अब्ज डॉलर्सचे ट्रेझरी बिल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अल्प-मुदतीत बाजारात लिक्विडिटी वाढू शकते.
वाचा - 'डेड इकोनॉमी' म्हणणारे Donald Trump तोंडावर पडले; अमेरिकन कंपन्यांची भारतात मोठी गुंतवणूक!
भारतीय बाजारांवर काय परिणाम?
फेडच्या धोरणांचा थेट परिणाम विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या प्रवाहावर आणि रुपयाच्या दरांवर होतो. फेडने दर कपात थांबवल्यास, रिझर्व्ह बँकेलाही भविष्यात व्याजदरांबाबत अधिक सावध धोरण स्वीकारावे लागेल. भारताची देशांतर्गत वाढ मजबूत असली तरी, जागतिक स्तरावर पैशाची उपलब्धता कमी झाल्यास बाजारातील अस्थिरता वाढू शकते.
