UPI Rule Change: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) अनेक श्रेणींमध्ये UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती, जी आजपासून लागू होणार आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे हाय व्हॅल्यू डिजिटल व्यवहार सोपे करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलत, NPCI नं व्यवहार मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. UPI पेमेंटच्या नियमांमध्ये हे महत्त्वाचे बदल आजपासूनच म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ पासून लागू होत आहेत. यानंतर, आता इन्शुरन्स, कॅपिटल मार्केट, लोन EMI आणि ट्रॅव्हल श्रेणींमध्ये, प्रति ट्रान्झॅक्शन ५ लाख रुपयांपर्यंत, तर दररोज १० लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतील.
नवीन मर्यादा कुठे लागू होईल?
UPI पेमेंटसाठी नवीन मर्यादा पर्सन टू मर्चेंट (P2M) पेमेंटवर लागू होईल. याचा अर्थ असा की हा बदल व्हेरिफाईड व्यवसायिक आणि संस्थांना पेमेंटवर लागू होईल. या अंतर्गत, काही श्रेणींमध्ये, जास्तीत जास्त ५ लाख रुपये, तर काही श्रेणींमध्ये, जास्तीत जास्त १० लाख डेली ट्रान्झॅक्शन करता येईल.
आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
२४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, NPCI नं या बदलाची माहिती दिली आणि UPI आता सर्वात पसंतीचा पेमेंट मोड बनला आहे आणि मोठ्या व्यवहारांची वाढती मागणी लक्षात घेता, UPI पेमेंटचं डेली लिमिट वाढवण्याचं हे पाऊल उचललं जात असल्याचं म्हटलं. ही वाढलेली मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतच्या टॅक्स भरण्याच्या श्रेणी अंतर्गत येणाऱ्या संस्थांना लागू असेल.
P2P पेमेंटमध्ये बदल नाही
दरम्यान, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला (P2P) द्वारे पैसे पाठवण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही आणि तो पूर्वीप्रमाणेच दररोज १ लाख रुपयांवर राहील. NPCI द्वारे UPI पेमेंट मर्यादेत केलेला हा बदल विशेषतः अशा UPI युजर्सना दिलासा देणारा आहे, ज्यांना पूर्वी एक नव्हे तर अनेक व्यवहार करावे लागत होते किंवा मोठं पेमेंट करण्यासाठी पर्यायी बँकिंग चॅनेलचा अवलंब करावा लागत होता. या बदलानंतर, ते सहजपणे हाय व्हॅल्यू व्यवहार करू शकतील.