लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : धनत्रयोदशी ते दिवाळी या काळामध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ने (यूपीआय) पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (एनपीसीआय) आकडेवारीनुसार, या काळात यूपीआय व्यवहारांची वाढ इतर सर्व पेमेंट पद्धतींपेक्षा वेगाने झाली. लाेक खरेदीसाठी यूपीआय जास्त वापरत असल्याचे यावरुन दिसते.
या तीन दिवसांच्या कालावधीत दररोज सरासरी ७३.७ कोटी यूपीआय व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या ५६.८ कोटी व्यवहारांच्या तुलनेत ते ३० टक्क्यांनी जास्त आहेत. चार वर्षांत यूपीआय व्यवहार तिप्पट वाढले आहेत. यावर्षी यूपीआय व्यवहारांचे एकूण मूल्य ८७,५६९ कोटी रुपये इतके झाले आहे.
गेल्या चार वर्षांत यूपीआय व्यवहार तिपटीने वाढले. २.७% वाढ एकूण यूपीआय व्यवहारांच्या रकमेत झाली आहे. छोट्या व्यवहारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाढ कमी दिसते.
विक्री वाढणार : जीएसटी दर सुधारणेमुळे या वर्षी ग्राहक खर्चात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते. २० लाख कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी होण्याची शक्यता आहे.
ई-कॉमर्समध्ये क्रेडिट कार्डच बॉस
क्रेडिट कार्ड व्यवहारांतही मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन व्यवहारांत ही वाढ दिसून येत आहे. क्रेडिट कार्डांच्या ई-कॉमर्स व्यवहारांमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. डेबिट कार्ड वापरात मात्र २४% घट झाली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी क्रेडिट कार्डांद्वारे होणाऱ्या ई-कॉमर्स व्यवहारांनी पीओएस (दुकानातील स्वाइप) व्यवहारांवर मात केली आहे. या काळात ई-कॉमर्समध्ये ४.८ कोटी क्रेडिट कार्ड व्यवहार झाले. पीओएस व्यवहारांची संख्या ४.२ कोटी इतकी राहिली. डेबिट कार्ड आणि वॉलेटसारख्या प्रीपेड साधनांचा वापर मात्र घटला आहे. वॉलेट व्यवहारांत २६ टक्के घट झाली आहे.