सध्या जगभरातील तंत्रज्ञान (Tech) उद्योग मोठ्या उलथापालथीच्या टप्प्यातून जात आहे. कर्मचाऱ्यांच्या कपातीची (Layoff) बातमी आता रोजची झाली आहे. ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि गूगल नंतर आता आयबीएम (IBM - इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्प) या कंपनीनेही कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, या कर्मचारी कपातीच्या फेऱ्यात हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची भीती आहे. कंपनीनं म्हटलंय की, त्यांच्या व्यावसायिक मॉडेलला सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्रावर केंद्रित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
कपात कधी होणार?
आयबीएम (IBM) याच तिमाहीपासून कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. बदलत्या तांत्रिक वातावरणात स्पर्धा टिकवून ठेवण्यासाठी कंपनी आपल्या रिसोर्सेसमधून नवीन व्यवसाय क्षेत्रांमध्ये गुंतवण्याची योजना आखत आहे.
"आयबीएम आपल्या कर्मचाऱ्यांच्या वर्कफोर्सचा नियमितपणे आढावा घेते आणि गरजेनुसार रिबॅलन्सिंग करते," असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. "आम्ही चौथ्या तिमाहीत असं एक पाऊल उचलत आहोत, ज्याचा परिणाम आमच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या एका लहान भागावर होईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कपातीचं कारण काय?
रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, आयबीएमच्या क्लाउड सॉफ्टवेअर सेगमेंटमधील वाढीचा वेग गेल्या महिन्यात धीमा झाला आहे. हेच सेगमेंट कंपनीच्या भविष्यातील रणनीतीचं प्रमुख केंद्र आहे. शेअर बाजारातही याचा परिणाम दिसून आला. आयबीएमचे शेअर्स यावर्षी ३५% नी वाढले असले तरी, मंगळवारी ते सुमारे २% नी घसरले.
या कपातीचा परिणाम अमेरिकेतील काही कर्मचाऱ्यांवर होईल, तरी कंपनीनं हे स्पष्ट केलंय की, देशातील एकूण रोजगाराची संख्या अंदाजे समान राहील. २०२४ च्या अखेरीस आयबीएममध्ये सुमारे २.७ लाख कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी आता हजारो लोकांच्या नोकरीवर धोका निर्माण झाला आहे.
आयबीएमचे हे पाऊल जागतिक ट्रेंडचा एक भाग आहे, ज्यात मोठ्या टेक कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ऑटोमेशनच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्या वर्कफोर्समध्ये कपात करत आहेत.
