नवी दिल्ली - गेल्या काही वर्षात भारताच्या कुठल्याही शहरात स्वस्तात हॉटेल शोधणं OYO च्या मदतीने सोपं झालं आहे. अल्पावधीतच OYO कंपनी नावारुपाला आली. कंपनीने नवीन वर्ष २०२५ पासून त्यांच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्यात अविवाहित जोडप्यांना एन्ट्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत कुठल्याही कपल्सला OYO हॉटेलमध्ये सहजपणे रूम उपलब्ध व्हायची परंतु कंपनीने त्यावर निर्बंध आणले आहेत. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून हा नवीन नियम लागू होणार आहे.
रिपोर्टनुसार, OYO सलग्न हॉटेलमध्ये यापुढे जे अविवाहित जोडपे आहेत त्यांना बंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे जोडपे ओयो हॉटेल रुम बुक करतील त्यांना विवाहित असल्याचा पुरावा द्यावा लागेल. अविवाहित जोडप्यांना चेक इनवर या नवीन वर्षापासून हा नियम लागू करण्यात आला असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ येथून या नियमाची सुरूवात झाली असून उर्वरित सर्व शहरात लवकरच हा नियम लागू होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले.
जोडप्यांना द्यावा लागेल लग्नाचा पुरावा
OYO च्या नव्या नियमावलीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसह सर्व जोडप्यांना आता चेक-इनच्या वेळी त्यांच्या नातेसंबंधाचा वैध पुरावा सादर करावा लागेल. यासोबतच कंपनीने मेरठमध्ये हा नियम लागू केल्यानंतर त्याचा फीडबॅक आणि परिणाम पाहून देशातील इतर शहरांमध्ये हा नियम लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो असं सूत्रांचा हवाला देऊन रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
कंपनीनं का उचललं हे पाऊल?
OYO हॉटेलबाबत अनेकदा सोशल मीडियात चर्चा झाली होती. विशेषत: मेरठ आणि अन्य शहरातील काही लोकांनी अविवाहित जोडप्यांना रूम न देण्याची मागणी कंपनीकडे केली होती. त्यानुसार कंपनीने हा बदल केला आहे. कंपनीने केलेला हा बदल कितपत फायदेशीर ठरतो हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, OYO कंपनीचा उद्योग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरला आहे. जवळपास ३० हून अधिक देशात कंपनीचे हॉटेल्स आणि होम स्टे सुविधा उपलब्ध आहे. त्याशिवाय कंपनीच्या नेटवर्कमध्ये दीड लाखाहून अधिक हॉटेल्स आहेत. कंपनीची सेवा भारतासोबतच इंडोनेशिया, मलेशिया, डेनमार्क, अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड, जपान, मॅक्सिको, ब्राझीलसारख्या देशात उपलब्ध आहे.