Union Budget 2025 Live Updates : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प मांडत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सुरू आहे. दरम्यान, बिहार विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांत जाहीर होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात बिहारची विशेष काळजी घेतली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली. याशिवाय, बिहारसाठी शिक्षण आणि हवाई सेवांसह आणखी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
मखाना बोर्डाची स्थापना
अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुधारण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना करण्यात येईल. हे बोर्ड पीएफओ आयोजित करेल आणि मखाना लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देईल. यासोबतच संबंधित सरकारी योजनांचे फायदे शेतकऱ्यांना मिळतील, याची खात्री केली जाईल.
फूड प्रोसेसिंगसाठी इन्स्टिट्यूटची स्थापना
बिहारमध्ये फूड प्रोसेसिंग म्हणजेच अन्न प्रक्रियांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंटची स्थापन केली जाईल. ही संस्था पूर्व भारतात अन्न प्रक्रियांना प्रोत्साहन देईल. याशिवाय, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
बिहारमध्ये नवीन विमानतळाचे बांधकाम
अर्थमंत्री निर्मला सीतारम यांनी १२० नवीन जागांसाठी उडान योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत, बिहारमध्ये नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उघडले जातील. बिहारमध्ये तीन नवीन विमानतळ बांधले जातील. यामध्ये पाटणा विमानतळाचा समावेश असणार आहे. यासोबतच वेस्टर्न कोशी कॅनाल आणि मिथिला प्रदेशासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. वेस्टर्न कोशी कॅनाल प्रोजेक्टसाी आर्थिक मदत दिली जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
पाटणा आयआयटीचा विस्तार
बिहारमध्ये २०१४ नंतर सुरू झालेल्या आयआयटीमध्ये पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. यामुळे, अतिरिक्त विद्यार्थी या आयआयटीमध्ये शिक्षण घेऊ शकतील. पाटणा आयआयटीचा विस्तार केला जाईल. वसतिगृहे आणि इतर पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.