union wellness deposit scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने बहुतेक बँकानी कर्ज स्वस्त केली आहेत. यामुळे कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे, बँकेतील ठेवींची वाढ मंदावली आहे. कारण, ठेवींवर मिळणारा व्याजदर घटले आहेत. ज्यामुळे बँका ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स आणत आहेत. या पार्श्वभूमीवर युनियन बँक ऑफ इंडियाने एक योजना सुरू केली आहे.
युनियन वेलनेस डिपॉझिट योजना काय आहे?
लहान गुंतवणूकदारांनी आकर्षित करण्यासाठी, युनियन बँकेने 'युनियन वेलनेस डिपॉझिट' नावाची मुदत ठेव योजना सुरू केली आहे. ही योजना वित्त आणि आरोग्य लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. जेणेकरून ग्राहकांना विमा संरक्षणासह आर्थिक लाभ मिळतील. या योजनेचा उद्देश जास्तीत जास्त लोकांना जोडणे आहे, जेणेकरून त्यांच्या गुंतवणूक आणि आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करता येतील. १८ ते ७५ वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. ही योजना वैयक्तिक आणि संयुक्त खात्यांसाठी खुली आहे. संयुक्त सेटअपमध्ये विमा संरक्षण फक्त प्राथमिक खातेधारकांपुरते मर्यादित असते.
किमान १० लाख रुपये गुंतवावे लागतील
युनियन वेलनेस डिपॉझिटमध्ये किमान गुंतवणूक १० लाख रुपये आहे तर कमाल ३ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. याचा कालावधी ३७५ दिवसांचा असून या दरम्यान ठेवीदारांना वार्षिक ६.७५% व्याजदर मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त फायदे
ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त ०.५०% व्याज दिले जाते. या योजनेत मुदतपूर्व बंद करण्याची आणि ठेवींवरील कर्ज घेण्याची सुविधा देखील मिळते, ज्यामुळे त्याची लवचिकता वाढते. या योजनेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ३७५ दिवसांचे सुपर टॉप-अप आरोग्य विमा कव्हर मिळते. यामध्ये ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय उपचार मिळतात.
वाचा - 'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
युनियन बँकेचे चौथ्या तिमाहीचे निकाल
युनियन बँक ऑफ इंडियाने मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात ५०% वाढ नोंदवली असून तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ३,३११ कोटी रुपयांच्या तुलनेत ४,९८५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकूण उत्पन्नातही वाढ झाली, जी गेल्या वर्षीच्या ३१,०५८ कोटी रुपयांवरून ३३,२५४ कोटी रुपयांवर पोहोचली. निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ९,५१४ कोटी रुपयांवर स्थिर राहिले, तर व्याजेतर उत्पन्न ५,५५९ कोटी रुपयांनी वाढले.