Uday Kotak Warning : कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी वर्षभरापूर्वी व्यक्त केलेली भीती आता वास्तवात येताना दिसत आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली असून, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत दंडात्मक कर लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उदय कोटक यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला या नव्या 'आर्थिक युद्धा'चा इशारा दिला आहे.
काय होती कोटकांची भविष्यवाणी?
नोव्हेंबर २०२४ मध्ये उदय कोटक यांनी एक ट्विट केले होते, जे त्यांनी पुन्हा शेअर केले आहे. कोटक यांच्या मते, अमेरिका ही जगातील सर्वोच्च लष्करी, आर्थिक आणि तांत्रिक शक्ती आहे. ट्रम्प प्रशासनाखाली अमेरिका आपल्या या शक्तीचा वापर इतर देशांवर दबाव टाकण्यासाठी करेल. प्रत्येक देशाला आता अमेरिकेच्या या नव्या रूपाचा सामना करण्यासाठी भौगोलिक-राजकीय आणि व्यापार क्षेत्रांत सज्ज राहावे लागेल.
रशियन तेल खरेदीदारांना ५००% टॅरिफचा फटका
वॉशिंग्टनमधून मिळालेल्या वृत्तानुसार, 'रशियावरील निर्बंध अधिनियम २०२५' अंतर्गत अमेरिका एका कठोर विधेयकाला पाठिंबा देत आहे. जे देश रशियाकडून कच्चे तेल, ऊर्जा उत्पादने किंवा युरेनियमची खरेदी करतील, त्यांच्याकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर किमान ५००% आयात शुल्क लावले जाईल. जर रशियाने युक्रेनसोबत शांतता चर्चा करण्यास नकार दिला किंवा कराराचे उल्लंघन केले, तर अमेरिका हे 'ब्रह्मास्त्र' वापरणार आहे.
My tweet on US absolute power, in November 2024. Playing out as anticipated. https://t.co/0QZyvWXTqI
— Uday Kotak (@udaykotak) January 8, 2026
भारताला 'दुहेरी' फटका
८ जानेवारी रोजी भारतासाठी अमेरिकेकडून दोन धक्कादायक बातम्या आल्या. पहिली, रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणाऱ्या भारताला आता अमेरिकेच्या ५००% टॅरिफच्या धमकीमुळे व्यापारात मोठी अडचण येऊ शकते. आणि दुसरी म्हणजे ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याच्या धोरणांतर्गत, भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'आंतरराष्ट्रीय सौर आघाडी'मधून अमेरिकेने बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
वाचा - २० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
अमेरिकेची वित्तीय तूट : कमजोरी की ताकद?
उदय कोटक यांनी आपल्या पोस्टमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे- "अमेरिकेची राजकोषीय तूट ही त्यांची कमजोरी आहे का?" सध्याच्या परिस्थितीत अमेरिका आपली तूट भरून काढण्यासाठी व्यापार युद्धाचा आणि टॅरिफचा वापर करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
