Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने उद्योगजगत ते रोजगारापर्यंत सगळ्यांना बसेल फटका

ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने उद्योगजगत ते रोजगारापर्यंत सगळ्यांना बसेल फटका

Trump's tariff : भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव आता आणखी तीव्र होणार आहे. २७ ऑगस्टपासून अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लागू केलेल्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. याचा मोठा फटका उद्योगांना बसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 08:40 IST2025-08-27T08:40:10+5:302025-08-27T08:40:44+5:30

Trump's tariff : भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव आता आणखी तीव्र होणार आहे. २७ ऑगस्टपासून अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लागू केलेल्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. याचा मोठा फटका उद्योगांना बसणार आहे.

Trump's tariff bomb will hit everyone from industry to jobs | ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने उद्योगजगत ते रोजगारापर्यंत सगळ्यांना बसेल फटका

ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने उद्योगजगत ते रोजगारापर्यंत सगळ्यांना बसेल फटका

नवी दिल्ली/वॉशिंग्टन -  भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव आता आणखी तीव्र होणार आहे. २७ ऑगस्टपासून अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लागू केलेल्या आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. याचा मोठा फटका उद्योगांना बसणार आहे. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास २० टक्के माल अमेरिकेला जातो; पण शुल्कवाढीमुळे भारतीय उत्पादने इतर देशांच्या तुलनेत महाग होतील. विशेषतः व्हिएतनाम, बांगलादेश आणि मेक्सिकोच्या तुलनेत. त्यामुळे भारतीय माल मागे पडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचा दावा काय? 
ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की भारताने रशियन तेल स्वस्त दरात आयात केले. यामुळे युक्रेन युद्धविरामासाठी रशियावर दबाव टाकण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांमध्ये अडथळा येतो आहे. त्यामुळे हे शुल्क भारतावर दबाव टाकण्यासाठी लावले गेले आहे.

महाराष्ट्रातील दहा ते बारा लाख रोजगारांना फटका?
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ लावल्यामुळे महाराष्ट्रातील निर्यातधारित उद्योगांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. विशेषतः रत्ने-दागिने, वस्त्र, सीफूड आणि लेदर उद्योगांवर याचा परिणाम होणार आहे. मुंबईतील दागिने निर्यात केंद्र, सोलापूर-इचलकरंजीतील कापड उद्योग, कोकणातील सीफूड निर्यात तसेच कोल्हापूरसह लेदर उद्योग अमेरिकन बाजारावर अवलंबून आहेत. शुल्कवाढीमुळे ऑर्डर कमी होण्याची शक्यता असून रोजगारावर ताण येणार आहे. राज्यातील तब्बल दहा ते बारा लाख रोजगारांना या निर्णयाचा थेट धोका निर्माण झाला आहे.

पुढे काय होऊ शकते? : टॅरिफ दीर्घकाळ राहिले, तर इंजिनिअरिंग वस्तू, चामडे, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन निर्मिती या क्षेत्रांवरही परिणाम होईल. भारताची अमेरिकेतील निर्यात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घटू शकते, ज्यामुळे परकीय चलनाचा साठा कमी होईल.

टॅरिफ बॉम्बमुळे राज्ये चिंतित; केंद्राला मदतीचे साकडे!
अमेरिकेचा ५० टक्के आयात कर (टॅरिफ) लागू होत असून, त्याचा किती परिणाम निर्यातीवर होतो, या प्रश्नाने राज्य सरकारे चिंतित असल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांनी  संभाव्य हानीचा आढावा घेणे सुरू केले असून, पर्याय म्हणून नवीन बाजारांचा शोध सुरू केला आहे. केंद्र सरकारकडे मदतीची मागणीही राज्यांकडून करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडू यांसह सर्व राज्ये आपल्या निर्यात धोरणाचा आढावा घेत आहेत.

अमेरिकी टॅरिफमुळे कपड्यांचे उत्पादन ठप्प : अमेरिकेच्या टॅरिफमुळे निर्यात उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. तिरुपूर, नोएडा आणि सूरत येथील कपड्यांचे उत्पादकांनी उत्पादन थांबवले आहे. फिओने अमेरिकेच्या या निर्णयाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

चीनला उद्ध्वस्त करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा धमकावले असून चीनच्या ‘रेअर अर्थ’ खनिजांवर २०० टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याचा इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनकडे काही पर्याय आहेत, परंतु अमेरिकेकडे अविश्वसनीय पर्याय आहेत तरीही आम्ही त्यांचा वापर करणार नाही. 
वॉशिंग्टनकडे असे काही 'कार्ड्स' आहेत की ते वापरल्यास जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला चीन उद्ध्वस्त होऊ शकतो. ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी नुकतीच चर्चा केली असून ते बीजिंग भेटीचा विचार करत आहेत. चीनसोबतचे संबंध टिकवून ठेवण्याची त्यांची भूमिका असूनही त्यांनी स्पष्ट केले की, आवश्यकता भासल्यास कठोर पावले उचलली जातील.

टॅरिफमुळे कोणते  क्षेत्र सर्वाधिक प्रभावित? 
कापड आणि वस्त्रोद्योग : या उद्योगाला मिळणाऱ्या ऑर्डर्स आता इतर आशियाई देशांच्या मालामार्फत पूर्ण केल्या जातील.
रत्न आणि दागिने : २०२४ मध्ये, भारताने ९.२ अब्ज डॉलर्सचे दागिने निर्यात केले होते. मात्र, आता हा माल पाठवणे थांबले.
ऑटो पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स : जास्त खर्चामुळे नफ्यावर विपरीत परिणाम झाला आहे.  बेरोजगारीची भीती वाढली.
सी-फूड : अर्ध्याहून अधिक उत्पादन अमेरिकेला पाठवणारे कोळंबी निर्यातदार या शुल्कवाढीमुळे संकटात.
भारताची भूमिका : परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या या निर्णयाला अन्यायकारक आणि अवाजवी म्हटले आहे. 

Web Title: Trump's tariff bomb will hit everyone from industry to jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.