भारतीय स्पर्धा आयोगानं (CCI) पॉवर आणि आरोग्य क्षेत्रातील प्रमुख समूह टोरेन्ट समूहाला इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी गुजरात टायटन्समध्ये हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. सीसीआयला बुधवारी दिलेल्या नोटीसमध्ये, प्रस्तावित संयोजनाचं (इरेलिया स्पोर्ट्स इंडिया प्राइव्हेट लिमिटेड) ६७ टक्के भागभांडवल खरेदी आणि अधिग्रहणकर्त्याच्या (टोरेन्ट इन्व्हेस्टमेंट) नियंत्रणाशी संबंधित असल्याचं म्हटलं. टोरेन्ट इन्व्हेस्टमेंट्स ही टोरेन्ट समूहाची होल्डिंग कंपनी आहे.
इरेलियाकडे ३३ टक्के हिस्सा
इरेलिया स्पोर्ट्स इंडिया इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सची अहमदाबाद फ्रँचायझी चालवते. स्पर्धा कायद्याच्या कलम ६ (४) अन्वये प्रस्तावित संयोजन अधिसूचित केले जात असल्याचं म्हटलंय. गेल्या आठवड्यात टोरेन्ट ग्रुपनं गुजरात टायटन्समध्ये बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. यामुळे अहमदाबादची ही कंपनी आता क्रीडा क्षेत्रातही उतरली आहे. या करारानुसार इरेलियाचा फ्रँचायझीमध्ये ३३ टक्के हिस्सा असेल.
२२ मार्चपासून सुरू होणार आयपीएल
दरम्यान, पाकिस्तान आणि दुबईत सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीतील सामने संपल्यानंतर पुढील महिन्यापासून आयपीएलची सुरुवात होईल. आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च रोजी खेळला जाईल. आयपीएलच्या या सीजनमध्ये गुजरात टायटन्सचा पहिला सामना पंजाब किंग्ससोबत २५ मार्च रोजी होईल. हा सामना अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्डेडियममध्ये खेळवला जाईल.