State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारीबँक आहे. एसबीआयबद्दल देशातील जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. परंतु एसबीआयची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का? आजच्याच दिवशी म्हणजेच १ जुलै १९५५ रोजी देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयची स्थापना झाली. बँकेची स्थापना १९५५ मध्ये झाली असली तरी एसबीआयचा इतिहास २०० वर्षे जुना आहे. तर पूर्वीच्या काळी ही बँक एसबीआय या नावानं नव्हे तर दुसऱ्या नावानं ओळखली जात होती. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या इतिहासाबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
१८०६ पासून होते सुरुवात
एसबीआयचा इतिहास १९ व्या शतकाच्या पहिल्या दशकाचा आहे. २ जून १८०६ रोजी तत्कालिन कलकत्ता येथे बँक ऑफ कलकत्त्याची स्थापना झाली. त्यावेळी भारतात इंग्रजांचं युग सुरू होतं. २ जानेवारी १८०९ रोजी बँक ऑफ कलकत्ता बँक ऑफ बंगाल या नावानं ओळखली जाऊ लागली. ही बँक बंगाल सरकार पुरस्कृत ब्रिटिश भारतातील पहिली संयुक्त स्टॉक बँक होती.
भारतीय अर्थव्यवस्था सुस्साट, पण धोरणं आखणं होतंय कठीण; का म्हणाले RBI गव्हर्नर असं?
तीन मुख्य बँकांची स्थापना
बँक ऑफ बंगालच्या स्थापनेनंतर भारतातील बँकिंग क्षेत्राचा हळूहळू लक्षणीय विस्तार झाला. १८४० मध्ये मुंबईत बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली आणि पुढे १८४३ साली बँक ऑफ मद्रासचीही स्थापना झाली. या काळात तीन बँका प्रमुख ठरल्या. यामध्ये बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांचा समावेश आहे. या तिन्ही बँका प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीसाठी उघडण्यात आल्या, पण या बँकांकडे खासगी क्षेत्राचं भांडवलही होतं.
इंपीरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना
सन १९२१ मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांचे बँक ऑफ बंगालमध्ये विलीनीकरण झालं आणि तीन बँकांसह इंपीरियल बँक ऑफ इंडिया सुरू झाली. भारतात स्वातंत्र्यानंतरही इंपीरियल बँक ऑफ इंडिया कार्यरत राहिली आणि १९५५ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) स्थापना झाली. आरबीआयनं इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचा ताबा घेतला. ३० एप्रिल १९५५ रोजी इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं.
१ जुलै १९५५ रोजी स्थापना
१ जुलै १९५५ रोजी इंपीरियल बँक ऑफ इंडियाचं नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं. अशा तऱ्हेनं देशातील इम्पीरियल बँकेची सर्व कार्यालयं एसबीआय कार्यालयांमध्ये रूपांतरित करण्यात आली. ऑक्टोबर १९५५ मध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही एसबीआयची पहिली सहयोगी बँक बनली.
आजच्या काळात एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. एसबीआयच्या २२,५०० हून अधिक शाखा आणि ६२ हजारांपेक्षा जास्त एटीएम आहेत. याशिवाय एसबीआयचे ५० कोटींहून अधिक ग्राहक आहेत. त्याचबरोबर बँकेचं कामकाज आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलंय.