लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जर कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर पुढील दोन ते तीन महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऊर्जा संवाद ’मध्ये त्यांनी ही माहिती दिली.
जर इराण-इस्रायल तणावासारखा तणाव निर्माण झाला नाही तर तेलाच्या किमती स्थिर राहतील. सध्या तेलाच्या किमती ६५ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्या असून, सरकारी कंपन्यांचा नफा वाढत आहे. अशा परिस्थितीत, सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून जनतेला दिलासा देऊ शकते.
प्रतिलिटर २२ रुपये टॅक्स : केंद्र सरकार पेट्रोलवर सरासरी २१.९० कर आकारते. दिल्ली सरकार १५.४० व्हॅट आकारते. एकूण कर प्रतिलिटर ३७.३० रुपये आहे. केंद्र सरकार डिझेलवर १७.८० रुपये प्रतिलिटर कर आकारते. देशातील प्रत्येक व्यक्तीचा पेट्रोलचा सरासरी वापर दरमहा २.८० लिटर आहे आणि डिझेल ६.३२ लिटर आहे.
अमेरिकेची धमकी झुगारली
रशियाकडून कच्चे तेल घेतले तर खैर नाही या धमकीला भारताने
झुगारून लावले. रशियाकडून तेल खरेदी करण्यावर दुटप्पीपणा करू नका, या शब्दांत भारताने नाटोला फटकारले आहे.
तर रशियाकडून तेल पुरवठ्यात कोणत्याही प्रकारच्या अडथळा आला तर भारत इतर देशांकडून तेल खरेदी करू शकतो, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. आज, रशिया भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ४० टक्के तेलाचा पुरवठा करतो.
पेट्रोलच्या किमतीचे गणित
बेस प्राईज ४८.२३ रुपये
केंद्राचे शुल्क २७.९० रुपये
डिलर कमिशन ३.८६ रुपये
राज्याचा व्हॅट ३०.१९ रुपये
एकूण १०३.५० रुपये
प्रत्येक लिटरवर १५ रुपयांचा फायदा अन् कंपन्या मालामाल : सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रतिलिटर १२-१५ रुपये आणि डिझेलवर ६.१२ रुपये नफा कमवत आहेत. असे असूनही, तेल कंपन्यांनी दर कमी केलेले नाहीत.