Success Story : यश मिळवण्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर गरज असते ती जिद्द आणि कल्पकतेची. ही गोष्ट खरी करून दाखवली आहे केरळच्या एम. पी. रामचंद्रन यांनी. एकेकाळी खाजगी नोकरी करणाऱ्या या व्यक्तीने केवळ ५ हजार रुपयांच्या भांडवलावर आज १३,५८३ कोटी रुपयांची 'ज्योती लॅबोरेटरीज' ही कंपनी उभी केली आहे. पांढऱ्या शुभ्र कपड्यांची शान वाढवणारा 'चार थेंब वाला, उजाला' आज प्रत्येक घराचा अविभाज्य भाग आहे.
अकाउंटंट ते उद्योजक
केरळच्या त्रिशूरमधील रहिवासी असलेल्या रामचंद्रन यांनी सेंट थॉमस कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अकाउंटंट म्हणून नोकरी सुरू केली. पगार चांगला होता, पण त्यांना नेहमीच स्वतःचे काहीतरी वेगळे आणि 'क्रिएटिव्ह' उत्पादन तयार करायचे होते. त्यांना विशेष रस होता तो लाँड्री संबंधित प्रॉडक्ट्समध्ये.
स्वयंपाकघरातील प्रयोगातून जन्मला 'उजाला'
कपड्यांसाठी चांगल्या दर्जाचा 'व्हाईटनर' (नीळ) बनवण्यासाठी रामचंद्रन यांनी घराच्या स्वयंपाकघरातच प्रयोग सुरू केले. एके दिवशी एका मासिकात त्यांनी वाचले की, जांभळ्या रंगाच्या वापरामुळे कपड्यांचा पांढरेपणा अधिक उजळता येतो. त्यानंतर सुमारे एक वर्ष त्यांनी विविध रंगांसोबत प्रयोग केले आणि अखेर त्यांना 'उजाला' तयार करण्यात यश आले.
मुलीच्या नावाने पहिली फॅक्टरी
व्यवसाय सुरू करण्यासाठी रामचंद्रन यांनी आपल्या भावाकडून ५,००० रुपये उसने घेतले. त्यांनी आपल्या मुलीच्या नावाने म्हणजेच 'ज्योती लॅबोरेटरीज' नावाने लॅब सुरू केली. सुरुवातीला अनेक उत्पादने बनवली, पण खरी जादू केली ती 'उजाला सुप्रीम लिक्विड फॅब्रिक व्हाईटनर'ने. केवळ २-३ रुपयांच्या बाटलीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली.
१३,५८३ कोटींचे मार्केट कॅप
आज 'ज्योती लॅबोरेटरीज' ही एक मोठी मल्टी-ब्रँड कंपनी बनली आहे. त्यांच्या उत्पादनामध्ये उजाला लिक्विड क्लॉथ व्हाईटनर, मॅक्सो जे डास प्रतिबंधक उत्पादने आहेत. तसेच हेन्को आणि प्रिल नावाचे उत्पादन जे डिटर्जंट आणि भांडी घासण्याचे लिक्विड आहे.
वाचा - ईपीएफओ पेन्शनधारकांचे अच्छे दिन! किमान पेन्शनमध्ये ५ पटीने वाढ होण्याची शक्यता
आज शेअर बाजारात ज्योति लॅबोरेटरीजचे मार्केट कॅप १३,५८३ कोटी रुपयांच्या पार गेले आहे. एका अकाउंटंटने पाहिलेले छोटे स्वप्न आज हजारो कुटुंबांना रोजगार आणि देशाला उत्तम उत्पादने देत आहे.
