आजकाल नवे बचत खाते उघडणे खूप सोपे झाले आहे. जास्त व्याज, कॅशबॅक, शून्य शिल्लक, नवे ॲप, अशी अनेक कारणे नेहमीच मिळतात. हळूहळू अनेकांकडे चार-पाच, कधी त्याहून अधिक बचत खाती होतात. वरवर पाहता हे शहाणपणाचे वाटते. पण प्रत्यक्षात यामुळे गोंधळ वाढतो आणि पैशांवरचा ताबा कमी होतो.
एक-दोन खाती असणे चूक नाही. अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा खूप खाती असतात; पण त्यांचा ठोस उपयोग ठरलेला नसतो. जुन्या नोकरीतील पगार खाते, घरखर्चासाठी संयुक्त खाते, सोयीसाठी डिजिटल बँक, जास्त व्याजासाठी वेगळे खाते, अशी खाती नकळत वाढत जातात.
जास्त बचत खात्यांमुळे नेमका फटका कसा बसतो? -
जास्त बचत खात्यांमुळे पैसे वेगवेगळ्या खात्यांत विखुरले जातात व अडकूनही पडतात. या खात्यांत थोडीथोडी रक्कम निष्क्रिय पडून राहते. मोठी रक्कम किमान शिलकेसाठीच अडकते.
जास्त व्याज देणाऱ्या खात्यांच्या अटी पूर्ण न झाल्याने अपेक्षित फायदा मिळत नाही. महागाई मात्र शांतपणे आपले काम करत राहते. याचा मानसिक ताणही मोठा असतो.
