न्यूयॉर्क : जगातील सर्वांत यशस्वी गुंतवणूकदार आणि ‘ओमाहाचे जादूगार’ म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांनी बुधवारी ‘बर्कशायर हॅथवे’ या आपल्या महाकाय कंपनीच्या सीईओ पदाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. वयाच्या ९५ व्या वर्षी सक्रिय कामातून निवृत्त झाल्यानंतर आता या साम्राज्याची धुरा त्यांचे उत्तराधिकारी ग्रेग अबेल यांच्या खांद्यावर असेल.
‘सर्वांत मोठी चूक’ सर्वांत मोठे यश
बफे यांनी ही कंपनी एखाद्या व्यावसायिक गणितातून नाही, तर चक्क रागाच्या भरात खरेदी केली होती. १९६४ मध्ये कंपनीचे तत्कालीन मालक मिस्टर स्टँटन यांनी ठरलेल्या किमतीपेक्षा केवळ १२ सेंट कमी देऊन बफेट यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
या अपमानाचा बदला घेण्यासाठी बफे यांनी स्टॉक विकण्याऐवजी संपूर्ण कंपनीच विकत घेतली आणि स्टँटन यांना कामावरून काढून टाकले.
बफे आजही याला त्यांची ‘सर्वांत मोठी चूक’ मानतात, कारण एका बुडत्या टेक्सटाइल मिलमध्ये त्यांनी पैसे अडकवले होते. मात्र, त्यांच्या दूरदृष्टीने याच कंपनीचे रूपांतर आज ९८ लाख कोटी रुपये मूल्याच्या महाकाय साम्राज्यात झाले आहे. रिटायरमेंट म्हणजे ‘मृत्यू’पेक्षाही भयानक असे त्यांनी म्हटले होते.
३४ लाख कोटींची कॅश
नवे सीईओ ग्रेग अबेल यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान बर्कशायरकडे असलेल्या ३४ लाख कोटी रुपयांच्या रोख रकमेचा वापर करण्याचे आहे. बफे यांच्याप्रमाणेच ते कंपन्यांच्या कामात ‘हस्तक्षेप न करण्याचे’ धोरण कायम ठेवतात की नवीन बदल करतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
संपत्तीचा त्याग, दातृत्वाचा आदर्श : बफे यांनी ९९% संपत्ती दान करण्याचा संकल्प केला आहे. मुलांना इतकी संपत्ती नक्की द्या की, ज्यातून ते काहीही करू शकतील; पण त्यांना इतकीही संपत्ती देऊ नका की, ते आळशी बनतील, असे बफे यांनी म्हटले होते
