TCS Salary Hike 2026: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक वेतनवाढ लागू करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२६ पासून प्रभावी मानली जाईल. मात्र, पगारात नक्की किती टक्के वाढ होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 'बिझनेस स्टँडर्ड'च्या वृत्तानुसार, कंपनीचे सीएचआरओ सुदीप कुन्नुमल यांनी सांगितलं की, सर्व ग्रेडमधील पात्र कर्मचाऱ्यांना यावेळी वार्षिक इन्क्रिमेंट मिळेल. उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकात वेतनवाढ दिली जाऊ शकते, असं कंपनीनं म्हटलंय.
AI वर भर आणि भरती प्रक्रिया सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, कुन्नुमल यांनी सांगितलं की, कंपनी चौथ्या तिमाहीत भविष्यासाठी सज्ज कर्मचारी वर्ग तयार करण्यावर विशेष लक्ष देत आहे. या काळात अनुभवी प्रोफेशनल्ससोबतच कॅम्पस हायरिंगमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये 'AI-फर्स्ट' कल्चर मजबूत करण्यावर आणि कर्मचाऱ्यांना एआय संबंधित कौशल्यांनी सज्ज करण्यावर मुख्य भर होता. ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी ताळमेळ राखण्यासाठी आर्थिक वर्ष २०२७ मध्येही हेच प्राधान्य कायम ठेवण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय.
फ्रेशर्स आणि अनुभवी प्रोफेशनल्सना संधी
टीसीएस फ्रेशर्स आणि अनुभवी प्रोफेशनल्सची भरती सुरूच ठेवणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. विशेषतः एआय, डेटा, एंटरप्राइज सोल्यूशन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, क्लाउड, सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल इंजिनिअरिंग या क्षेत्रांतील भरतीवर अधिक जोर असेल. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीनं ॲडव्हायझरी आणि कन्सलटिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या ७५० हून अधिक प्रोफेशनल्सची नियुक्ती केली आहे. तसंच टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्समधील गुंतवणूकही वाढवण्यात आली आहे.
कर्मचारी संख्या आणि मागील कल
आर्थिक वर्ष २०२६ च्या शेवटी टीसीएसची एकूण कर्मचारी संख्या ५,८४,५१९ इतकी होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील (६,०७,९७९) संख्येपेक्षा कमी आहे. मात्र, तिमाही आधारावर चौथ्या तिमाहीत कंपनीनं २,३५६ नवीन कर्मचारी जोडले आहेत. कंपनीच्या मते, सध्या २.७ लाख कर्मचाऱ्यांकडे एआय आणि मशीन लर्निंगमध्ये उच्च पातळीवरील स्कील्स आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टीसीएसनं वेतनवाढीला पाच महिने उशीर केला होता आणि ती सप्टेंबर २०२५ मध्ये लागू झाली होती. त्यावेळी सरासरी वाढ ४.५% ते ७% दरम्यान होती, तर टॉप परफॉर्मर्सना तेव्हाही दुहेरी अंकात इन्क्रिमेंट मिळालं होतं.
