अलीकडेच एक बातमी समोर आली होती. राजस्थानात भाजी विक्रेत्याने पंजाब राज्य लॉटरी दिवाळी बंपर २०२५ मध्ये ११ कोटी बक्षिस जिंकले. हा व्यक्ती रस्त्यावर भाजी विकण्याचं काम करतो. त्याच्याकडे लॉटरी खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. मित्रांकडून उधारीचे पैसे घेऊन त्याने लॉटरी खरेदी केली. त्यातून त्याला ११ कोटी रक्कमेची लॉटरी लागली. परंतु जिंकलेले ११ कोटी त्याच्या खात्यात येणार नाही, कारण यातील रक्कमेवर आयकर भरावा लागणार आहे.
माहितीनुसार, पंजाब राज्य लॉटरी जिंकणारा अमित सेहरा भाजी विकण्याचं काम करतो. तो मूळचा राजस्थानच्या कोटपुतली शहरात राहणारा आहे. मागील काही दिवसांपूर्वी तो पंजाबच्या मोगा शहरात फिरायला गेला होता. तेव्हा त्याने मित्रांकडून १ हजार कर्ज घेतले. याच पैशातून त्याने २ लॉटरी तिकीट खरेदी केल्या होत्या. एक स्वत:च्या नावावर तर दुसरी पत्नीच्या नावावर होती. त्यानंतर भटिंडा येथेही आणखी एक तिकीट खरेदी केले. त्या लॉटरीचा निकाल ३१ ऑक्टोबरला आला. त्यात अमितला ११ कोटी किंमतीची लॉटरी लागली तर पत्नीच्या नावे घेतलेल्या तिकीटावर १ हजार रुपये जिंकले. लॉटरीत इतकी मोठी रक्कम जिंकल्यानंतर तो रातोरात कोट्यधीश झाला.
किती पैसे सरकारला द्यावे लागणार?
याबाबत CA कमलेश कुमार सांगतात की, भारतात लॉटरीवर इन्कम टॅक्स कायद्यात ११५ बी बी, आणि १९४ बी अंतर्गत कराबाबत माहिती आहे. लॉटरीतून जिंकलेल्या रक्कमेतून ३० टक्के इन्कम टॅक्स भरावा लागतो. त्याशिवाय ४ टक्के हेल्थ अँन्ड एज्युकेशन सेसही लावला जातो. त्याचा अर्थ ११ कोटी रक्कमेवर ३० टक्के टॅक्स म्हणजे ३ कोटी ३० लाख रुपये आणि त्यानंतर ४ टक्के हेल्थ अँन्ड एज्युकेशन टॅक्स म्हणजे १३ लाख २० हजार रुपे द्यावे लागतील. म्हणजे एकूण रक्कमेवर ३ कोटी ४३ लाख २० हजार कर भरावा लागेल. इतकेच नाही तर यावरही सरचार्ज द्यावा लागतो.
सरचार्ज किती द्यावा लागतो?
११ कोटी रक्कम जिंकल्यानंतर अमित सेहराचे वार्षिक उत्पन्न ११ कोटीहून जास्त झाले. त्यातून त्याला सरचार्जही भरावा लागतो. त्यात ५० लाख १ कोटीपर्यंत १० टक्के, १ कोटी ते २ कोटीपर्यंत १५ टक्के, २ कोटी ते ५ कोटीपर्यंत २५ टक्के आणि ५ कोटींवर ३७ टक्के सरचार्ज द्यावा लागतो. लॉटरीवर सरचार्ज हा करावर आकारला जातो.
किती पैसे हाती येणार?
जर आपण सीएने दिलेल्या सूत्रानुसार गणित केले, तर अमित सेहरा यांना मूळ कर म्हणून ३,३०,००,००० रुपये भरावे लागतील. त्याव्यतिरिक्त, आरोग्य आणि शिक्षण उपकर म्हणून १३,२०,००० रुपये आकारले जातील. असे मिळून एकूण कर ३,४३,२०,००० रुपये असेल. आता यावर सरचार्ज ३७ टक्के असेल, म्हणजेच १,२६,९८,४०० रुपये. अशाप्रकारे अमित यांना भरावा लागणारा एकूण कर ३,४३,२०,००० रुपये + सरचार्ज १,२६,९८,४०० रुपये = ४,७०,१८,४०० रुपये होईल. याचा अर्थ असा की एकूण कर आणि सरचार्ज ४ कोटी ७० लाख १८ हजार ४०० रुपये असेल.
