TCS-Sam Altman Partnership: भारताच्या तंत्रज्ञान विश्वात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. टाटा समूह आणि त्यांची प्रमुख आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांनी 'OpenAI' सोबत धोरणात्मक एआय युती जाहीर केली आहे. ही भागीदारी 'एजंटिक एआय' सोल्यूशन्सपासून ते भारतात मोठे डेटा सेंटर्स उभारण्यापर्यंत विस्तारलेली आहे. भारताला जागतिक स्तरावर एआय (AI) केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भारतात उभारणार १०० मेगावॉटचं डेटा सेंटर
या कराराचा एक मुख्य भाग म्हणजे १०० मेगावॉट क्षमतेचं डेटा सेंटर असेल, जे भविष्यात १ गिगावॉटपर्यंत वाढवलं जाऊ शकतं. साधारणपणे १ गिगावॉट क्षमतेचं डेटा सेंटर उभारण्यासाठी ३५ ते ५० अब्ज डॉलर्स इतका खर्च येतो. हा प्रकल्प केवळ भारतातील एआय पायाभूत सुविधा मजबूत करणार नाही, तर देशाला जागतिक क्लाउड आणि डेटा इकोसिस्टममध्ये महत्त्वाची भूमिका मिळवून देऊ शकतो.
१ एप्रिलपासून मोठा बदल होणार! क्रेडिट कार्डाचे व्यवहार PAN कार्डात दिसणार, काय होणार परिणाम?
एजंटिक एआयमुळे उद्योगांचे कामकाज बदलणार
OpenAI आणि TCS मिळून 'एजंटिक एआय' सोल्यूशन्स विकसित करणार आहेत, जे विशेषतः विविध उद्योगांसाठी डिझाइन केले जातील. ही एआय यंत्रणा विशिष्ट परिस्थितीत स्वतंत्रपणे काम करण्यास सक्षम असेल, ज्यामुळे मानवी हस्तक्षेपाची गरज कमी होईल. याचा फायदा बँका, रुग्णालयं, कारखाने आणि दुकाने यांसारख्या क्षेत्रांना होऊन त्यांचं काम अधिक वेगवान आणि सोपं होईल. यामुळे कमी वेळेत जास्त काम होण्यास मदत होईल आणि चुकांची शक्यताही कमी होईल.
सॅम ऑल्टमन यांचा भारतावर विशेष भर
OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन सध्या भारतातील एआय समिटमध्ये सहभागी झालं आहेत. ते अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारण्याच्या योजनेवर काम करत आहेत. कंपनीनं "स्टारगेट" नावाच्या प्रकल्पांतर्गत ५०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची योजना आखली असून, ती पुढे १.४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवली जाऊ शकते. भारतातील ही भागीदारी OpenAI च्या जागतिक विस्तार धोरणाचा एक महत्त्वाचा भाग मानली जात आहे.
भारतीय तरुण आणि कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा
TCS आपल्या जागतिक ग्राहकांसाठी OpenAI वर आधारित सेवा विकसित करणार आहे. त्याचबरोबर, भारतातील तरुणांसाठी एआय प्रशिक्षण आणि संसाधनं उपलब्ध करून दिली जातील. टाटा समूहातील हजारो कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटीच्या एंटरप्राइझ व्हर्जनचा वापर करता येईल, ज्यामुळे समूहाच्या अंतर्गत डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनला मोठी चालना मिळेल.
