Tata Trust Venu Srinivasan: टाटा ट्रस्ट्समध्ये मतभेदांच्या बातम्यांदरम्यान एक मोठी बातमी आली आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि सर रतन टाटा ट्रस्टच्या (SRTT) विश्वस्तांनी विश्वस्त आणि उपाध्यक्ष वेणु श्रीनिवासन यांच्या फेरनियुक्तीला मंजुरी दिली आहे. ते आजीवन त्यांच्या पदावर कायम राहतील. यापूर्वी विश्वस्त आणि अध्यक्ष नोएल टाटा यांचीही जानेवारीत फेरनियुक्ती करण्यात आली होती आणि त्यांच्याही कार्यकाळाची कोणतीही मर्यादा नसेल. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांचा टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये एकत्रितपणे ५२% हिस्सा आहे.
आणखी एक विश्वस्त मेहली मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीवर पुढील काही दिवसांत विचार केला जाणार आहे. श्रीनिवासन यांची फेरनियुक्ती अपेक्षित होती. कारण टाटांच्या ट्रस्टनं १७ ऑक्टोबर २०२४ रोजी एकमतानं एक प्रस्ताव मंजूर केला होता. यात कोणत्याही विश्वस्ताचा कार्यकाळ संपल्यावर, त्या विश्वस्ताला संबंधित ट्रस्टद्वारे पुन्हा नियुक्त केलं जाईल आणि अशा नियुक्तीच्या कालावधीवर कोणतीही मर्यादा लादली जाणार नाही, असं नमूद करण्यात आलं होतं.
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
बैठकीत घेतलेले निर्णय
१७ ऑक्टोबर २०२४ च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की, जो कोणताही विश्वस्त दुसऱ्या विश्वस्ताच्या फेरनियुक्तीच्या विरोधात मतदान करेल, तो आपल्या वचनबद्धतेचं उल्लंघन करेल आणि ट्रस्टच्या बोर्डात सेवा करण्यासाठी अपात्र ठरेल. याचा अर्थ सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटाचे सर्व विश्वस्त आजीवन सेवा करतील. तसंच, हे देखील ठरवण्यात आलं की सर्व विश्वस्त समान रूपात जबाबदार आहेत. अशा प्रकारे विश्वस्तांची नियुक्ती केवळ एक औपचारिकता बनली आहे. जेआरडी टाटा, रतन टाटा, जमशेद भाभा आणि आरके कृष्ण कुमार हे आजीवन विश्वस्त राहिले आहेत.
नोशिर सूनावाला हे देखील आजीवन विश्वस्त होते, परंतु प्रकृती आणि वाढत्या वयामुळे ते दोन्ही ट्रस्टच्या बोर्डातून बाजूला झाले. तसेच, निश्चित कार्यकाळ असलेले विश्वस्तही राहिलं आहेत. सामान्यतः त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो, ज्यावर वेळोवेळी निर्णय घेतला जात होता. याच बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की ट्रस्ट्सद्वारे टाटा सन्सच्या बोर्डात नामांकित केलेल्या विश्वस्तांचं ७५ वर्षांचे वय पूर्ण झाल्यावर समीक्षा केली जाईल. याच मुद्द्यावरून गेल्या महिन्यात विश्वस्तांमध्ये मतभेद झाले होते.
सरकारचा हस्तक्षेप
माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांच्या संचालकपदाची समीक्षा करण्यात आली. त्यांना विश्वस्तांचं बहुमत मिळालं नाही. सिंह यांच्या जागी मेहली यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला गेला, परंतु नोएल टाटा यांनी हा प्रस्ताव फेटाळला. यानंतर सिंह यांनी टाटा सन्सच्या बोर्डातून राजीनामा दिला. या प्रकरणानं एवढा जोर धरले की, सरकारला यात हस्तक्षेप करावा लागला. टाटा समूहाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिल्लीत दोन वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली होती.