Tata Steel News: नेदरलँडमधील वेल्सन-नूरड येथील रहिवाशांनी टाटा स्टीलवर स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास हानी पोहोचवल्याचा आरोप करत १.४ अब्ज युरो (सुमारे १४८ अब्ज रुपये) नुकसानभरपाईची मागणी करणारा खटला दाखल केला आहे. टाटा स्टीलने गुरुवारी उशिरा शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली.
वेल्सन-नूरड रहिवाशांची संघटना 'स्टिचिंग फ्रिस विंड.एनयू'नं (SFW) हारलेम येथील उत्तर हॉलंड जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल केला असल्याचं कंपनीनं शेअर बाजाराला सांगितलं. याप्रकरणी टाटा स्टील नेदरलँड्स बी.व्ही. आणि टाटा स्टील इज्मुदेन यांना समन्स बजावण्यात आलं आहेत. दरम्यान, टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण नोंदवण्यात आली असून, बीएसईमध्ये कंपनीचा शेअर ०.५० टक्क्यांच्या घसरणीसह १६९.१५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
टाटा स्टीलनं फेटाळले सर्व आरोप
टाटा स्टीलने हे सर्व आरोप निराधार असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. कंपनीच्या प्लँट्समुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. यावर उत्तर देताना टाटा स्टीलने म्हटले आहे की, SFW नं या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांच्या दाव्यांमध्ये तथ्यांचा अभाव असून ते केवळ कल्पनेवर आधारित आहेत. टाटा स्टील सध्या SFW ने उपलब्ध करून दिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करत असून वकिलांचा सल्ला घेत आहे. तसंच या दाव्यांच्या संभाव्य परिणामांचे आकलनही केलं जात आहे. पर्यावरण रक्षणाबाबत आपण पूर्णपणे जागरूक असून कामकाजात त्यालाच प्राधान्य दिले जातं, असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.
कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील सुनावणी
टाटा स्टीलने या खटल्याचा तपशीलही सामायिक केला आहे. ही याचिका सार्वजनिक दाव्यांच्या सामूहिक सेटलमेंट संबंधित डच कायद्यानुसार (WAMCA) दाखल करण्यात आली आहे. कंपनीनं शेअर बाजाराला माहिती दिली की, या कायद्यांतर्गत सुनावणी दोन टप्प्यात पूर्ण होते. पहिला टप्पा प्रकरणाच्या स्वीकारार्हतेचा असतो आणि दुसऱ्या टप्प्यात त्याच्या गुणवत्तेवर विचार केला जातो. या दोन्ही टप्प्यांसाठी प्रत्येकी दोन ते तीन वर्षांचा काळ लागतो. त्यामुळे नजीकच्या काळात म्हणजेच पहिल्या टप्प्यादरम्यान नुकसानभरपाईच्या रकमेवर न्यायालयात कोणताही विचार केला जाणार नाही.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
