TATA Job Cut: देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहातील कर्मचाऱ्यांच्या कपातीचं (Layoffs) सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. टीसीएसमधून १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात होण्याच्या बातमीनं खळबळ उडवली असतानाच, आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा समूहाची ई-कॉमर्स आणि डिजिटल कंपनी टाटा डिजिटल (Tata Digital), तिच्या सुपर-ॲप टाटा न्यू (Tata Neu) मधून मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांची कपात करण्याची तयारी करत आहे.
माहितीनुसार, कंपनी ५०% पेक्षा जास्त कर्मचारी कमी करण्याची योजना आखत आहे. हा निर्णय कंपनीचे नवीन सीईओ सजिथ शिवानंदन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोठ्या पुनर्रचना अभियानाचा एक भाग आहे.
टाटा न्यूची नवी रणनीती
टाटा न्यूची सुरुवात मोठ्या अपेक्षांसह झाली होती, परंतु गेल्या दोन वर्षांत हे प्लॅटफॉर्म व्यवस्थित चालू शकलं नाही. कंपनी वारंवार आपली रणनीती बदलत राहिली आणि उच्च स्तरावरील अनेक अधिकाऱ्यांनी नोकरी सोडली. यामुळे प्लॅटफॉर्म अधिकच गुंतागुंतीचा बनला. आता नवीन सीईओ सजिथ शिवानंदन यांनी सूत्रे हाती घेतली असून, त्यांनी स्पष्ट केलंय की, टाटा न्यू आता केवळ विक्री (GMV) वाढवण्याच्या शर्यतीत सहभागी होणार नाही. कंपनी आता थेट नफ्यावर लक्ष केंद्रित करेल, म्हणजेच कमाई वाढवणं आणि अनावश्यक खर्च कमी करणं हे उद्दिष्ट आहे.
याच उद्दिष्टांतर्गत कंपनी आपले सर्व डिजिटल व्हर्टिकल्स एकत्र आणून एकीकृत करत आहे. यामुळे कामकाज सोपं होईल, प्रक्रिया सुलभ होतील आणि खर्चही कमी होईल. परंतु, याचा मोठा परिणाम कर्मचाऱ्यांवर होणार आहे. कंपनीमध्ये होत असलेल्या या मोठ्या पुनर्रचनेमुळे मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांची कपात जवळपास निश्चित मानली जात आहे. म्हणजेच, येणाऱ्या काळात टाटा न्यू आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करू शकते.
बिगबास्केट आणि क्रोमामध्येही बदल
इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, टाटा डिजिटल अंतर्गत कार्यरत असलेल्या बिगबास्केट (BigBasket) आणि क्रोमा (Croma) मध्ये देखील मोठ्या स्तरावर धोरणात्मक बदल होत आहेत. बिगबास्केटचं लक्ष आता फास्ट डिलिव्हरी असलेल्या BB Now मॉडेलला मजबूत करण्यावर आहे, जेणेकरून ब्लिंकिट, झोमॅटो आणि स्विगी इन्स्टामार्टसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करता येईल. दुसरीकडे, क्रोमा आपल्या ऑफलाइन ओळख मजबूत करण्याच्या दिशेनं तोटा करणारी स्टोअर्स बंद करत आहे आणि ई-कॉमर्सच्या शर्यतीत ॲमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याचे प्रयत्न सोडत आहे.
कंपनीचा फोकस आता तीन मुख्य व्यवसायांवर
रिपोर्टनुसार, टाटा डिजिटल आगामी काळात आर्थिक सेवा, मार्केटिंग आणि युनिफाईड लॉयल्टी इंजिन (Unified Loyalty Engine) यांसारख्या तीन मोठ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. टाटा समूहाच्या ब्रँड मूल्यापासून चांगली कमाई करणं, डिजिटल मार्केटिंगला सेंट्रलाईज्ड करणं आणि सर्व टाटा ब्रँड्ससाठी एक संयुक्त रिवॉर्ड सिस्टीम तयार करणं, हा याचा उद्देश आहे.
कमाई कमी झाली, तोटाही कमी झाला
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये टाटा डिजिटलचा महसूल १३.८% नं कमी होऊन ₹ ३२,१८८ कोटी राहिला. तथापि, कंपनीचा निव्वळ तोटा ₹ १,२०१ कोटींवरून घटून ₹ ८२८ कोटी झाला आहे. आता नवीन मॅनेजमेंट टीमसमोर आर्थिक स्थिती कशी सुधारायची आणि टाटा न्यू ला टिकाऊ आणि स्केलेबल मॉडेलवर कसं आणायचं, हे मोठं आव्हान आहे.
