मुंबई : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाने या वर्षी धनत्रयोदशी व दीपावलीच्या काळात विक्रीचा नवा विक्रम नोंदवला आहे. कंपनीला या सणासुदीच्या दिवसांत २५,००० हून अधिक वाहनांच्या डिलिव्हरीची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, केवळ दोन दिवसांच्या धनत्रयोदशी कालावधीत विक्रीत जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.
या संदर्भात टाटा मोटर्स प्रवासी वाहन विभागाचे मुख्य वाणिज्य अधिकारी अमित कामत म्हणाले, “यंदा धनत्रयोदशी व दीपावलीच्या डिलिव्हरी दोन-तीन दिवसांमध्ये विखुरलेल्या आहेत. कारण ग्राहक शुभ मुहूर्तांनुसार खरेदी करत आहेत. एकूणच मागणी मोठ्या प्रमाणावर मजबूत आहे.
जीएसटी २.० सुधारणेमुळे वाहन बाजाराला अधिक गती मिळाली आहे. त्यात सणासुदीच्या काळाची सकारात्मक भर पडली आहे. त्यामुळे आम्ही या सणासुदीच्या कालावधीत २५,००० हून अधिक वाहनांची डिलिव्हरी करू अशी अपेक्षा आहे.”
सप्टेंबर महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात तब्बल ५९,६६७ गाड्या विकल्या, जे गेल्या वर्षी याच महिन्यातील ४१,०६५ गाड्यांच्या तुलनेत ४५.३ टक्क्यांनी जास्त आहे. ही वाढ मुख्यत्वेकरून एसयूव्हींची प्रचंड मागणी आणि सतत विस्तारत असलेला इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा यामुळे
झाली. (वा.प्र.)