मुंबई : टाटा समूहाच्या शिखर पातळीवर मतभेद उफाळल्याची चर्चा रंगली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा निर्णय मंगळवारी पुढे ढकलला. सूत्रांच्या माहितीनुसार, टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी पुनर्नियुक्तीबाबत काही अटी मांडल्या. त्या अटींवर एकमत न झाल्याने हा निर्णय स्थगित करण्यात आला.
चंद्रशेखरन यांचा विद्यमान कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ पर्यंत आहे. त्यापूर्वीच पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव चर्चेसाठी आला होता. मात्र काही समूह कंपन्यांतील तोट्यांबाबत तसेच टाटा सन्सच्या कर्जवाढीबाबत नोएल टाटा यांनी चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
कर्जवाढीमुळे कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध (लिस्टिंग) व्हावे लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. सूत्रांनुसार, नोएल टाटा लिस्टिंगच्या बाजूने नसून त्याबाबत लेखी हमीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वादाचे मुख्य मुद्दे काय?
लिस्टिंगला विरोध : रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार टाटा सन्सला सप्टेंबर २०२५ पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होणे अनिवार्य आहे. मात्र, नोएल टाटा यांचा या 'लिस्टिंग'ला सक्त विरोध असून, त्यांनी चंद्रशेखरन याबाबत लेखी आश्वासन मागितले आहे.
कर्जाचा डोंगर : टाटा सन्सवर वाढत असलेले कर्ज आणि काही समूह कंपन्यांचा तोटा यावर नोएल टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निवडीवर पेच : बैठकीत इतर चार संचालकांनी चंद्रांना पाठिंबा दिला होता, मात्र एकमत न झाल्याने आणि नोएल टाटांच्या अटींमुळे खुद्द चंद्रशेखरन यांनीच हा निर्णय तूर्तास स्थगित करण्याची विनंती केली.
