Trump Tariff Impact : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मनमानी पद्धतीने टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळले. यातूनही भारतही सुटला नाही. देशातील ऑटोमाबाईल सेक्टरला याचा सर्वाधिक फटका बसला. टॅरिफ निर्णयानंतर टाटा मोटार्स कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या टाटा मोटर्सची मालकी असलेल्या जग्वार लँड रोव्हर कंपनीतून अमेरिकेला कार निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.
जग्वार लँड रोव्हरने सांगितली कंपनीची भूमिका
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'जग्वार लँड रोव्हर लक्झरी ब्रँडसाठी अमेरिका ही खास बाजारपेठ आहे. टॅरिफ निर्णयानंतर आम्ही आमच्या व्यावसायिक भागीदारांसोबत नवीन ट्रेडिंग टर्मच्या दिशेने काम करत आहोत. या धोरणानुसार, अल्पकाळासाठी एप्रिलमध्ये होणारी वाहनांची निर्यात थांबवली आहे. यासाठी आम्ही एक दीर्घकालीन योजनेवर काम करत आहोत.
यापूर्वी २ एप्रिल रोजी कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या ब्रँड्सना जगभर मागणी आहे. त्यामुळे व्यवसायाला बाजारातील बदलत्या परिस्थितींचा सामना करण्याची सवय आहे. आमचे प्राधान्य आता जगभरातील आमच्या ग्राहकांना सेवा देणे. नवीन टॅरिफ धोरणाला सामोरे जाणे आहे.
२००८ साली टाटा मोटर्स खरेदी केली होती कंपनी
जग्वार लँड रोव्हर ब्रँड पहिल्यापासून अमेरिकन बाजारपेठेत चांगला प्रस्थापित झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, जेएलआरच्या ४ लाखांहून अधिक युनिट्सपैकी सुमारे २३ टक्के अमेरिकन बाजारपेठेत विकले गेले. ही सर्व वाहने त्याच्या ब्रिटिश प्लांटमधून निर्यात केली जात होती. टाटा मोटर्सने २००८ मध्ये फोर्ड मोटर्सकडून JLR खरेदी केले.
वाचा - 'दुकानदारी'च्या विधानंतर पियुष गोयल यांची स्टार्टअप्ससाठी मोठी घोषणा, म्हणाले यापुढे...
भारतावर २६ टक्के टॅरिफ लागू
अमेरिकेने २ एप्रिलपासून भारतावर अतिरिक्त २६ टक्के आयात शुल्क लादले आहे. तर व्हिएतनाम ४६ टक्के, चीन ४३ टक्के, इंडोनेशिया ३२ टक्के आणि थायलंड ३६ टक्के आहे. भारतीय निर्यातदार अमेरिकेतील आयात शुल्काचा सामना करणाऱ्या प्रतिस्पर्धी देशांपेक्षा टॅरिफला सामोरे जाण्यासाठी खूप चांगल्या स्थितीत आहेत. गुंतवणूक आकर्षित करून, उत्पादन वाढवून आणि अमेरिकेला निर्यात वाढवून भारत याचा फायदा घेऊ शकतो.