जर तुम्ही समजत असाल की मोबाईल फोन स्वतःच्या पैशानं विकत घेतला आहे आणि ती तुमची संपत्ती आहे, तर ही घोर चूक आहे. जरी तुम्ही मोबाईल वापरत असाल, पण जर त्याच्या ओळखीशी (Identity) कोणत्याही प्रकारची छेडछाड केली, तर दूरसंचार विभाग (DoT) तुम्हाला कारवाईच्या कक्षेत आणू शकतो. दूरसंचार अधिनियम २०२३ (Telecommunications Act 2023) नुसार, तुमच्या मोबाईलच्या आयएमईआय (IMEI) नंबरशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई होऊ शकते.
कठोर शिक्षेची तरतूद का?
दूरसंचार विभागानं सर्व उत्पादक, ब्रँड मालक, आयातदार आणि विक्रेत्यांना जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटलंय की, मोबाईल फोनच्या १५-अंकी आयएमईआय (International Mobile Equipment Identity) नंबरसह दूरसंचार ओळखीशी संबंधित बाबींशी छेडछाड करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
शिक्षेची तरतूद: उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंत कैद, ५० लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
कारण: दूरसंचार ओळखीसह (किंवा IMEI) सह छेडछाड केल्यास कायदा अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीजना गुन्हेगारांवर नजर ठेवणं आव्हानात्मक होतं. याच कारणामुळे याला अजामीनपात्र गुन्ह्यांच्या श्रेणीत ठेवले आहे.
काय आहे IMEI नंबरचे काम?
दूरसंचार नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बनावट उपकरणांना रोखण्यासाठी, भारत सरकारनं दूरसंचार अधिनियम २०२३ आणि दूरसंचार सायबर सुरक्षा नियम २०२४ (Telecommunication Cyber Security Rules, 2024) अंतर्गत आंतरराष्ट्रीय मोबाईल उपकरण ओळख (IMEI) नोंदणीवर कडक नियम लागू केले आहेत आणि छेडछाडीस प्रतिबंध घातला आहे.
गुन्हा: दूरसंचार अधिनियम २०२३ नुसार, मोबाईल हँडसेट, मॉडेम, मॉड्यूल, सिम बॉक्स इत्यादींसारखे कोणतेही रेडिओ उपकरण जाणूनबुजून आपल्याकडे ठेवणं, ज्यात अनधिकृत किंवा छेडछाड केलेल्या दूरसंचार ओळखीशी संबंधित गोष्टींचा वापर झाला आहे, तो गुन्हा आहे.
अडचणी कधी वाढू शकतात?
हे गुन्हे अधिनियमाच्या कलम ४२(७) अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे आहेत. कलम ४२(६) अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांसाठी किंवा मदत करणाऱ्यांसाठी समान शिक्षेची तरतूद करते. दूरसंचार सायबर सुरक्षा नियम, २०२४ अंतर्गत हा नियम कोणत्याही व्यक्तीला विशिष्ट दूरसंचार उपकरण ओळख संख्या जाणूनबुजून हटवण्यास, मिटवण्यास, बदलण्यास किंवा सुधारित करण्यास किंवा दूरसंचार ओळखकर्ता किंवा दूरसंचार उपकरणाशी संबंधित हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरचा वापर, उत्पादन, वाहतूक, नियंत्रण किंवा ताबा ठेवण्यास प्रतिबंध करतो. दूरसंचार विभागाच्या मते, प्रोग्रामेबल IMEI क्षमता असलेल्या उपकरणांचा वापर करणं हे देखील IMEI मध्ये छेडछाड केल्यासारखंच आहे आणि ते कायदेशीर तरतुदींच्या अधीन असेल.
या उपकरणांचा वापरही काळजीपूर्वक करा
दूरसंचार नियमांनुसार, आयातदारांना IMEI असलेलं कोणतेही उपकरण (जसे की मोबाईल हँडसेट, मॉड्यूल, मॉडेम, सिम बॉक्स, इत्यादी) भारतात विक्री, चाचणी, संशोधन आणि विकास किंवा अन्य कोणत्याही उद्देशासाठी आयात करण्यापूर्वी, डिव्हाइस सेतू (भारतीय बनावट उपकरण प्रतिबंध (ICDR) पोर्टल) वर IMEI नंबर नोंदणीकृत करणं अनिवार्य केले आहे.
कडक नियमांमागील उद्देश
दूरसंचार विभागानं यावर भर दिला आहे की हे नियम दूरसंचार सायबर सुरक्षा राखण्यासाठी, फसवणूक रोखण्यासाठी, कायदा अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी आणि योग्य कर वसुली सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत. या कडक नियमांमुळे भारताचे दूरसंचार पायाभूत सुविधा बनावट आणि छेडछाड केलेल्या उपकरणांपासून सुरक्षित राहते.
