Oberois Success Story: मोहन सिंग ओबेरॉय यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. ते भारतातील हॉटेल उद्योगाचे प्रणेते मानले जातात. त्यांनी ओबेरॉय हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सची स्थापना केली, जी आज देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हॉटेल ब्रँड आहे. ओबेरॉय ग्रुपची भारत, इंडोनेशिया, इजिप्त, यूएई, मॉरिशस आणि सौदी अरेबियामध्ये ३१ हॉटेल्स आहेत. मोहन सिंग ओबेरॉय यांनी जगभरात ओबेरॉय आणि ट्रायडंट सारखी हॉटेल्स स्थापन करून भारतीय हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला जगभरात ओळख मिळवून दिली.
आज, ओबेरॉय समूहाच्या ईआयएच लिमिटेड आणि ईआयएच असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेड या दोन लिस्टेड कंपन्या आहेत. त्यांचं एकूण मार्केट कॅप सुमारे २५ हजार कोटी रुपये आहे. मोहन सिंग ओबेरॉय यांच्या एका सामान्य क्लार्कपासून ते भारतीय हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा आधारस्तंभ बनण्यापर्यंतची कहाणी अतिशय रंजक आहे.
कसे होते सुरुवातीचे दिवस?
मोहन सिंग यांचं सुरुवातीचं शिक्षण रावळपिंडी येथे झालं. त्यानंतर ते पदवीसाठी लाहोरला गेले. त्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात तो शिमल्याला गेले. जेव्हा ते सिमल्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना सेसिल हॉटेलमध्ये फ्रंट डेस्क क्लर्क म्हणून नोकरी मिळाली. त्यांना महिन्याला ५० रुपये मिळत होते. इथून मोहन सिंग यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांची मेहनत, ऊर्जा आणि तीक्ष्ण विचारांचा हॉटेलच्या इंग्रज मॅनेजरवर खोल ठसा उमटला. मोहन सिंग हे शिकण्यासाठी नेहमीच उत्सुक असत. डेस्क क्लार्कच्या कामाच्या पलीकडे जाऊन त्यांनी अतिरिक्त काम आणि नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
शिमल्यात नोकरी
काही वर्षांनी हॉटेल मॅनेजरने एक छोटंसं हॉटेल विकत घेतलं तेव्हा त्यांनी ओबेरॉय यांना आपल्यासोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. १९३४ मध्ये ओबेरॉय यांनी क्लार्क हॉटेल विकत घेऊन हॉटेल व्यवसायात प्रवेश केला. त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने आणि सर्व सामान गहाण ठेवून हॉटेल खरेदी केलं. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी कलकत्त्याचे ग्रँड हॉटेल भाड्यानं घेतलं. या हॉटेलमध्ये ५०० खोल्या होत्या. आपल्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने त्यांनी हॉटेलला यशस्वी आणि फायदेशीर व्यवसायात रुपांतरित केलं.
हळूहळू ओबेरॉय यांनी असोसिएटेड हॉटेल्स ऑफ इंडियाच्या (एएचआय) शेअर्समध्ये गुंतवणूक केली. सिमला, दिल्ली, लाहोर, मुरी, रावळपिंडी आणि पेशावर येथे या ग्रुपची हॉटेल्स होती. १९४३ मध्ये, त्यांनी एएचआयमध्ये कंट्रोलिंग स्टेक्स मिळविले आणि देशातील सर्वात मोठी हॉटेल चेन व्यवस्थापित करणारे ते पहिले भारतीय बनले. १९६५ मध्ये त्यांनी नवी दिल्लीत ओबेरॉय इंटरकॉन्टिनेंटल उघडलं आणि त्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी मुंबईत ३५ मजली ओबेरॉय शेरेटन उभारलं आणि आपल्या यशाचा प्रवास कायम ठेवला.
समूहाचा व्यवसाय
आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी जागतिक हॉटेल ब्रँड्सशी भागीदारी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली ओबेरॉय ग्रुपनं आपला दुसरा हॉटेल ब्रँड ट्रायडेंट लाँच केला. आज भारतात मुंबई, चेन्नई, गुरुग्राम (दिल्ली एनसीआर), हैदराबाद, भुवनेश्वर, कोचीन, आग्रा, जयपूर आणि उदयपूर या शहरांमध्ये दहा ट्रायडंट हॉटेल्स आहेत. याशिवाय सौदी अरेबियातील जेद्दाह येथेही आंतरराष्ट्रीय ट्रायडेंट मालमत्ता आहे. ओबेरॉय ग्रुपमध्ये जगभरात १२,००० हून अधिक कर्मचारी काम करतात. मोहन सिंग ओबेरॉय यांचे २००२ मध्ये वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झालं.