Share Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात तेजीचा कल मंगळवारीही कायम राहिला. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) १०१.२९ अंकांनी म्हणजेच ०.१२ टक्के वाढीसह ८४,८८०.१३ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी (NSE Nifty) देखील १९.२० अंकांच्या वाढीसह २५,९८५.२५ च्या स्तरावर व्यवहार करताना दिसला. सुरुवातीच्या सत्रात बीएसई मिडकॅप इंडेक्स सपाट व्यवहार करत आहे, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ०.४% ची वाढ दिसून येत आहे.
प्रमुख वाढ नोंदवणारे शेअर्स
एनएसईवर एसबीआय, टाटा स्टील, एल अँड टी, टायटन कंपनी आणि टाटा कंझ्युमर यांसारखे शेअर्स प्रमुख वाढ नोंदवणाऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत. तर, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब्स आणि टीसीएस यांसारख्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीच्या व्यापारात, निफ्टीमध्ये १,४९१ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि ८७४ शेअर्स रेड झोनमध्ये ट्रेड करत होते. १२१ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
या स्टॉक्सवर आहे खास लक्ष
आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे लक्ष इंडस टॉवर्स, इंटरग्लोब एव्हिएशन, पीएनबी हाउसिंग फायनान्स, इंडियन ऑइल, कॅनरा एचएसबीसी लाईफ सह अनेक स्टॉक्सवर आहे. हे स्टॉक्स त्यांच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत.
रुपया २१ पैशांनी घसरला
पीटीआयच्या वृत्तानुसार, मंगळवारी सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया २१ पैशांनी घसरून ८८.४० वर आला. महिन्याच्या अखेरीस आयातदारांकडून असलेल्या डॉलरची मागणी आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किंमतींमधील वाढ यामुळे हा दबाव निर्माण झाला. फॉरेक्स ट्रेडर्सनी सांगितले की, गुंतवणूकदार पुढील संकेतांसाठी बुधवारी फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयावर लक्ष ठेवून आहेत. बाजार २५-बेसिस-पॉइंट दर कपातीची ९७.८ टक्के शक्यता वर्तवत आहेत आणि त्यांनी सांगितलं की डिसेंबरमध्ये आणखी एका कपातीची अपेक्षा आहे.
इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये, रुपया ८८.३४ वर उघडला आणि डॉलरच्या तुलनेत ८८.४० वर घसरला, जो मागील बंद किंमतीपेक्षा २१ पैशांची घसरण दर्शवतो. सोमवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३६ पैशांनी घसरून ८८.१९ वर बंद झाला होता.
आशियाई शेअर बाजारात नफावसुलीचा कल
मंगळवारी आलेल्या जोरदार तेजीनंतर आज आशियाई शेअर बाजारात नफावसुलीचा कल दिसून आला. जपानचा निक्केई २२५ इंडेक्स ८८.३२ अंकांनी किंवा ०.१७% ने घसरून ५०,४२८ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर, हाँगकाँगचा हँग सेंग इंडेक्स ३३.३० अंकांनी किंवा ०.१३% ची किंचित वाढीसह ग्रीन झोनमध्ये कायम आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी इंडेक्स ४४.६२ अंकांच्या घसरणीसह रेड झोनमध्ये आला. परंतु, चीनचा शांघाय एसएसी कंपोजिट इंडेक्स ८.५० अंकांनी किंवा ०.२१% ची वाढ नोंदवत मजबूतपणे व्यवहार करत आहे.
