Infosys Job Opening: आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत १२,००० नवीन फ्रेशर्सची भरती केली आहे. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी जयेश सांगराजका यांनी १६ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या तिमाहीच्या अर्निंग कॉन्फरन्समध्ये सांगितलं की, इन्फोसिस वर्षभरात एकूण २०,००० फ्रेशर्सची नियुक्त करण्याच्या मार्गावर आहे. “वर्षाच्या सुरुवातीला आमचं लक्ष्य १५,००० ते २०,००० फ्रेशर्स घेण्याचं होतं. आतापर्यंत आम्ही १२,००० भरती केली आहे आणि आम्ही २०,००० चे वार्षिक लक्ष्य पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत,” असंही ते म्हणाले.
दुसऱ्या तिमाहीचे मजबूत निकाल
कंपनीने जुलै-सप्टेंबर २०२५ या दुसऱ्या तिमाहीत ₹७,३६४ कोटींचा शुद्ध नफा नोंदवला, जी वार्षिक तुलनेत १३.२% ची वाढ आहे. एकूण महसूल ₹४४,४९० कोटींपर्यंत पोहोचला, जो मागील वर्षाच्या तुलनेत ८.६% अधिक आहे. ऑपरेशनल मार्जिन २१% वर जवळजवळ स्थिर राहिलंय. कंपनीनं प्रति शेअर ₹२३ चा अंतरिम लाभांश घोषित केला, जो मागील वर्षापेक्षा सुमारे ९.५% जास्त आहे.
कर्मचारी संख्या आणि अॅट्रिशन दर
दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसनं आपल्या एकूण कर्मचारी संख्येत ८,२०३ ची वाढ केली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ३,३१,९९१ वर पोहोचली. कर्मचारी सोडण्याचं प्रमाण किंचित कमी होऊन १४.३% राहिलं, जे मागील तिमाहीच्या १४.४% पेक्षा थोडं कमी आहे.
एचसीएल टेक, टीसीएसच्या तुलनेत भरतीचा वेग जास्त
इन्फोसिसची स्पर्धक कंपनी HCLTech नं पहिल्या सहामाहीत ७,१८० फ्रेशर्सची भरती केली आहे. जुलैमध्ये इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांनीही सांगितलें होतं की, कंपनी यावर्षी एकूण २०,००० नवीन पदवीधरांना नियुक्त करण्याच्या योजनेवर काम करत आहे. हे जलद भरती धोरण टीसीएसच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे, कारण टीसीएसने स्किल गॅप आणि तांत्रिक बदलांना तोंड देत नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत जवळपास २% ची कपात केली आहे.
२०२५ मध्ये टेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात
२०२५ हे वर्ष टेक उद्योगासाठी भरती आणि कर्मचारी कपात दोन्हीच्या दृष्टीने अस्थिर राहिलंय. अनेक जागतिक आयटी आणि स्टार्टअप कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. गुगलनं जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास १०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे, प्रामुख्याने एआय आधारित धोरणात्मक पुनर्रचनेमुळे ही कपात करण्यात आली. ॲमेझॉननं आपल्या क्लाऊड, गेमिंग आणि ॲलेक्सा डिव्हिजनमध्ये १८,००० कर्मचाऱ्यांची कपात केली.
मेटाने २०२५ मध्ये आपल्या “Year of Efficiency” धोरणांतर्गत इतर क्षेत्रांमध्ये ५,००० हून अधिक पदं कमी केली. मायक्रोसॉफ्टनं विविध विभागांमध्ये ७,५०० नोकऱ्यांमध्ये कपात केली, विशेषतः लिंक्डइन आणि अझ्युर डिव्हिजनमध्ये ही कपात करण्यात आली. टीसीएसने भारतात आधीच २% कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे, तर विप्रो आणि टेक महिंद्रानेही २०२५ मध्ये मर्यादित प्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. दुसरीकडे, इन्फोसिस आणि HCLTech सारख्या भारतीय कंपन्या अजूनही एआय आणि क्लाऊड डोमेनमध्ये नवी भरती वाढवत आहेत, ज्यामुळे देशांतर्गत आयटी उद्योगात किंचित सकारात्मकता दिसत आहे.