Microsoft Gaming CEO Asha Sharma: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टनं आपल्या गेमिंग विभागाच्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. गेली ३८ वर्षे कंपनीशी जोडलेले फिल स्पेन्सर आता निवृत्त होत असून, त्यांच्या जागी भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंटपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आशा शर्मा यापूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये एआय मॉडेल्स आणि सेवांच्या उत्पादन विकास विभागाच्या प्रमुख होत्या. इन्स्टाकार्टमध्ये मुख्य परिचालन अधिकारी आणि मेटामध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. एआय आणि प्लॅटफॉर्म अनुभवातील त्यांच्या कौशल्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग धोरणाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एक्सबॉक्स समोरील आव्हानं आणि नवीन रणनीती
हा बदल अशा वेळी झाला आहे जेव्हा मायक्रोसॉफ्टच्या एक्सबॉक्स व्यवसायावर वाढता खर्च आणि स्पर्धेचा दबाव आहे. ताज्या अहवालानुसार, डिसेंबर तिमाहीत गेमिंग महसुलात सुमारे ९.५ टक्क्यांची घसरण झाली असून वाढत्या खर्चामुळे हार्डवेअरच्या किमतीही वाढवाव्या लागल्यात. २०२३ मध्ये ॲक्टिव्हिजन ब्लिझार्डची ६९ अब्ज डॉलर्सची खरेदी केल्यानंतर आता त्यांच्या एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, आशा शर्मा यांनी स्पष्ट केलं की, त्या एक्सबॉक्स कन्सोलवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच कोर एक्सबॉक्स फॅन्स आणि खेळाडूंप्रती असलेली बांधिलकी अधिक मजबूत करतील. गेमिंग आता केवळ एका उपकरणापुरतं मर्यादित न राहता पीसी, मोबाईल आणि क्लाउडवर विस्तारलं पाहिजं, असा त्यांचा मानस आहे.
सत्या नडेला यांची प्रतिक्रिया
फिल स्पेन्सर यांनी जवळपास ४० वर्षे मायक्रोसॉफ्टमध्ये काम कालं आणि एक्सबॉक्स ब्रँडला जागतिक ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते या जूनपर्यंत सल्लागार भूमिकेत राहतील जेणेकरून नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी सोपवण्याची प्रक्रिया सुलभ होईल. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी आशा शर्मा यांच्या नियुक्तीचं स्वागत करताना म्हटलं की, त्यांनी यापूर्वी कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या सेवा यशस्वीपणे स्केल केल्या आहेत. तसंच मॅट बुटी यांची चीफ कन्टेंट ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते आशा शर्मा यांना रिपोर्ट करतील. मॅट यांच्या नेतृत्वाखाली हॅलो, कॉल ऑफ ड्युटी आणि कॅन्डी क्रश यांसारख्या प्रसिद्ध फ्रँचायझी असलेले ४० स्टुडिओ कार्यरत आहेत.
आपल्या निवृत्तीबाबत बोलताना फिल स्पेन्सर यांनी हा प्रवास एक मोठा असल्याचं वर्णन केलं आणि आशा शर्मा यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, एक्सबॉक्सच्या अध्यक्षा आणि सीओओ सारा बाँड कंपनी सोडत आहेत. विश्लेषकांच्या मते, आशा शर्मा आता 'एक्सबॉक्स एव्हरीवेअर' रणनीतीवर भर देतील, ज्यामध्ये एआयच्या मदतीने गेम सर्च, युजर एंगेजमेंट आणि डेव्हलपर टूल्स अधिक सक्षम केले जातील. सोनीच्या प्लेस्टेशनशी असलेली कडवी झुंज आणि बाजारपेठेतील हिस्सा टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आता नवीन नेतृत्वासमोर असणार आहे.
