Sonu Nigam Leased out a Property: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यानं मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये एक मोठी व्यावसायिक मालमत्ता भाड्यानं देऊन मोठी डील केली आहे. त्यानं सांताक्रूझ ईस्ट येथील आपली एक आलिशान कमर्शियल जागा तब्बल दरमहा १९ लाख रुपये इतक्या मोठ्या भाड्यावर दिली आहे. यावरून स्पष्ट होतं की मोठे सेलिब्रिटी देखील शहराच्या वाढत्या प्रॉपर्टी मार्केटचा फायदा घेत आहेत.
स्क्वायर यार्ड्सला महानिरीक्षक नोंदणी (IGR) पोर्टलवर मिळालेल्या प्रॉपर्टी कागदपत्रांनुसार, हा करार डिसेंबर २०२५ मध्ये रजिस्टर झाला. 'ट्रेड सेंटर बीकेसी'मधील या जागेचा आकार ४,२५७ चौरस फूट (सुमारे ३९५ चौरस मीटर) आहे. या डीलसाठी ३.२७ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि १००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आलं. याशिवाय, ९० लाख रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिटही (Security Deposit) घेण्यात आलं आहे.
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
पाच वर्षांत कोट्यवधींचं भाडं मिळणार
हा लीज करार पाच वर्षांसाठी करण्यात आला आहे. पहिल्या वर्षीचं भाडे दरमहा १९ लाख रुपये असेल. दुसऱ्या वर्षी ते ५.२६% ने वाढून २० लाख रुपये होईल. तिसऱ्या वर्षापासून भाडं दरवर्षी ५% नं वाढेल. त्यानुसार, तिसऱ्या वर्षी २१ लाख, चौथ्या वर्षी २२.०५ लाख आणि पाचव्या वर्षी २३.१५ लाख रुपये भाडं असेल. एकूणच पाहता, सोनू निगम याला या पाच वर्षांच्या कालावधीत १२.६२ कोटी रुपये भाड्यापोटी मिळतील.
प्रॉपर्टीमध्ये वाढणारी गुंतवणूक
ही डील दर्शवते की सोनू निगमसारखे मोठे कलाकार प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवत आहेत. दरमहा १९ लाख रुपयांचे भाडे ही खरोखरच मोठी रक्कम आहे, जे या प्रॉपर्टीचे प्रीमियम लोकेशन आणि मूल्य अधोरेखित करते. हा करार केवळ सोनू निगम याच्यासाठीच नव्हे, तर मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठीही एक सकारात्मक संकेत आहे.
इतर सेलिब्रिटींनीही भाड्यानं दिल्या प्रॉपर्टी
सोनू निगम यांच्याप्रमाणेच इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांच्या प्रॉपर्टी भाड्याने दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी करिश्मा कपूर यांनी मुंबईतील वांद्रे वेस्ट (Bandra West) येथील आपला एक फ्लॅट दरमहा ५.५१ लाख रुपये भाड्यावर दिला आहे. हा करार नोव्हेंबर २०२५ मध्ये रजिस्टर झाला. काजोलनंही काही महिन्यांपूर्वी मुंबईतील गोरेगाव येथील आपली प्रॉपर्टी एचडीएफसी बँकेला ९ वर्षांसाठी भाड्यानं दिली आहे. बँक पहिल्या तीन वर्षांसाठी काजोलला दरमहा ६.९ लाख रुपये देईल आणि त्यानंतर दर तीन वर्षांनी भाड्यामध्ये १५ टक्के वाढ होईल.
