नवी दिल्ली : सर्वसामान्यांकडून एसआयपीद्वारे होत असलेल्या गुंतवणुकीचा फायदा भारतीय म्युच्युअल फंडाला मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वसामान्यांमध्ये वाढलेल्या गुंतवणुकीच्या ओढीमुळे भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. सरत्या वर्षात म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेत तब्बल १४ लाख कोटी रुपयांची विक्रमी वाढ झाली असून, नोव्हेंबरअखेरपर्यंत हा आकडा ८१ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतलेला असतानाही, भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांनी ‘एसआयपी’च्या (एसआयपी) जोरावर बाजार सावरून धरला आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकट चालसानी यांनी म्हटले आहे.
पाच वर्षांत ५० लाख कोटींची घेतली मोठी झेप
पाच वर्षांत म्युच्युअल फंडने ५० लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली. २०२४च्या अखेरीस ६७ लाख कोटींवर असलेला हा आकडा २०२५ मध्ये ८१ लाख कोटींवर गेला आहे.
ही वाढ २०२४ मधील ३१ टक्के आणि २०२३ मधील २७ टक्क्यांपेक्षा कमी असली तरी दीर्घकालीन दृष्टीने उद्योगाचा प्रवास मजबूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
का वाढतोय कल? -
बचतीचे आर्थिकीकरण : लोक आतापारंपरिक गुंतवणुकीकडून म्युच्युअल फंडांकडे वळत आहेत.
पारदर्शकता : सेबीचे कडक नियम आणि पारदर्शक व्यवहारामुळे विश्वास वाढला आहे.
लार्ज-कॅपला पसंती : मोठ्या कंपन्यांच्या व हायब्रीड फंडांना पसंती.
